Breaking News

लेट लतीफ आणि बेशिस्त कर्मचार्‍यांना शिस्तीचा दणका

नाशिक : मनपा आयुक्त तुकाराम मुंढे रजेवर असल्याने सर्वच कर्मचार्‍यांना मुक्त वाव मिळालेला असतांना... पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी लेट लतीफ आणि बे शिस्त कर्मचार्‍यांना चांगलाच दणका दिला.

मनपा आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेची बदली नाशिकला झाल्याचे कळताच महापालिका कर्मचार्‍यांमध्ये शिस्तीची दहशत आपोआप निर्माण झाली होती. त्यात आयुक्तांनी खाते प्रमुखांच्या पहिल्याच बैठकीत वरिष्ठ अधिकार्‍यांची झाडा झडती घेतल्यानंतर इतर कर्मचारी सुतासारखे सरळ झाले होते. महापालिका कामकाजात कमालीची सुधारणा झाली होती. आता सुखाचे दिवस गेले आणि प्रत्यक्षात काम करण्याचे दिवस आले, अशी चर्चा कर्मचार्‍यांमध्ये होती. मात्र, गेल्या दहा दिवसापासून आयुक्त रजेवर असल्याने काही कर्मचारी सुखावले आणि आयुक्तांच्या रजा काळ सुखनैव उपभोगण्याचे मांडे खाण्यात व्यस्त झाले. मात्र या आनंदावर पुर्व विभागाच्या विभागीय अधिकार्‍यांच्या कर्तव्यदक्षतेने विरजण टाक ले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास विविध कारणाने कार्यालयात लेट झालेल्या कर्मचार्‍यांचे हजेरी मस्टर ताब्यात घेऊन विभागीय अ धिकारी जयश्री सोनवणे यांनी चांगलेच खडे बोल सुनावले.
विभागीय अधिकार्‍यांच्या अचानक कारवाईमुळे अनेक कर्मचार्‍यांना लेट शेर्‍याला सामोरे जावे लागले. तर इतर कर्मचार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. त्यातही एका महाभाग कर्मचार्‍याने वेगळी क्लुप्ती लढवत हजेरी मस्टर उचलण्याचा अयशस्वी प्रयत्न देखील केला. शिवाय विविध कारणाने उशीर झालेल्या कर्मचार्‍यापैकी इतरांनी विभागीय अधिकार्‍यांचे मन वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला मात्र, सोनवणे यांच्या पुढे कुणाचीही डाळ शिजली नाही.
आयुक्त मुंढे रजेवर असतांना कर्मचारी कसे बेढरपणे वागतात, वावरतात आणि किती टाईमपास करतात याचीच प्रचिती विभागीय कार्यालयात आलेल्या सर्व सामान्य नागरिकांना होत होती. त्या पार्श्‍वभुमीवर विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांनी केलेल्या कारवाईचे स्वागत होत आहे.