Breaking News

फांद्या कापण्याचे आदेश असताना झाडांची कत्तल; शासकीय मुद्रणालयासमोर मुंबई पालिकेचा प्रताप

मुंबई - शहरातील चर्नी रोड स्टेशनच्या लगत असलेल्या शासकीय मुद्रणालयाच्या समोर असलेल्या झाडाच्या फांद्या कापण्याचे आदेश पालिका उपसंचालकांनी दिलेले होते. मात्र उपसंचालकाच्या या आदेशाला पालिकेने केराची टोपली दाखवली आणि कंत्राटदारासोबत संगनमत करून अनेक वर्षांपासून उभी असलेली फळझाडेच कापून टाकली आहेत.


प्रामुख्याने शासकीय मुद्रणालयांच्या प्रवेशद्वारावर असलेल्या बादामांच्या तीन झाडांची पूर्णपणे कत्तल करण्यात आली आहे. तर रस्त्यावर ही झाडे कापल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बादामाच्या फळांचा खच साचला आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात या भागातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात शासकीय मुद्रण व संचालनालयाचे उपसंचालक मनोहर गायकवाड यांनी महापालिकेच्या ’डी’ वार्डच्या सहाय्यक उद्यान अधीक्षकांना पत्र लिहून त्यात केवळ धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी दिली होती. मात्र उपसंचालकांच्या आदेशाला फाटा देत महापालिकेच्या अधिकार्‍यांनी शासकीय मुद्रण व संचालनालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या व कुठलाही धोका नसलेल्या तीन झाडांची पूर्ण कत्तल करून त्याची लाकडेही काही मिनिटांच्या आत पळवल्याचे समोर आले आहे.
आम्ही केवळ वाढलेल्या आणि त्यात धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्या कापण्याची परवानगी दिली होती. त्यासाठी महापालिकेच्या ’डी’ वार्डच्या सहाय्यक उद्यान विभागाला दिलेल्या पत्रात तसे स्पष्ट उल्लेखदेखील आहेत. मात्र यात झाड पूर्णपणे छाटून टाकण्याचे कुठेही आदेश अथवा परवानगी देण्यात आली नाही. यामुळे मुद्रण संचालनालयाच्या प्रवेशद्वारावर कापण्यात आलेल्या त्या झाडांबद्दल आम्ही पालिका अधिकार्‍यांना जाब विचारणार असल्याचे शासकीय मुद्रण व संचालनालयाचे उपसंचालक मनोहर गायकवाड यांनी सांगितले आहे.