Breaking News

बहुजननामा- प्रतिक्रांती कालची व आजची !!

बहुजनांनो.... !


ईसवी पुर्व 300 ते ईसवी 400! जवळपास 700 वर्षांचा हा सुवर्ण काळ! बौद्ध धम्मक्रांतीच्या महावटवृक्षाखाली बसून तिची गोड फळे चाखाणार्‍यांचा हा काळ! धम्म-प्रबोधन क्रांतीने विषमतावादी वर्णव्यवस्था नष्ट केलेली. श्रमिक वर्णीय शुद्र वर्णातून मुक्त होऊन पुग व श्रेणी च्या नव-व्यवस्थेत मुक्तपणे, स्वतंत्रतेचे व प्रतिष्ठेचे जीवन जगत होते! श्रमिकांची गुलामगिरी नष्ट झाल्याने ते दसपटीने जास्त उत्पादन करू लागले होते. देशातील सर्वच जनतेला पुरून उरणारे हे जास्तीचे उत्पादन पुर्वेकडील देशाकडील मार्केट मध्ये जाऊ लागले. उत्पादन, व्यापार हेच तर कोणत्याही समाजाचे मागास वा पुढारलेपणा मोजण्याचे एकक होय! त्याकाळी विकासाचा जीडीपी वगैरे मोजण्याची काही साधने नव्हती. मात्र काठीला सोने बांधून सुरक्षित प्रवास करण्याचा तो काळ! याचा अर्थ प्रत्येकाच्या घरात इतके सोने असावे की दुसर्‍याच्या सोन्याकडे इर्षेने नव्हे तर आनंदाने बघण्याचा तो काळ!

कोणतीही क्रांती तीच्या स्वतःच्या अर्थव्यवस्थेवर चालते. बौद्ध धम्म क्रांतीने श्रमिकांना मुक्त करून आर्थिक क्रांती केली. पण तीच्या पायाशी सांस्कृतिक, सामाजिक व अध्यात्मिक-मानसिक क्रांतीचे भरभक्कम असे आधारस्तंभ उभे होते. अशा या 700 वर्षे आयुष्य असलेल्या भरभक्कम समतावादी, विज्ञानवादी व मानवतावादी समाजव्यवस्थेला सुरूंग लागून जातीव्यवस्थेची प्रतिक्रांती कशी झाली? एकाच गावात राहणारे विविध व्यावसायिक जे पुर्वी धम्म प्रभावाखालील समाजव्यवस्थेत एकमेकांना प्रतिष्ठीत समजत होते, ते ब्राह्मणी प्रतिक्रांतीच्या जातीव्यवस्थेत एकमेकांना निच-उच व अस्पृश्य कसे समजू लागलेत?? या प्रश्नांची उत्तरे आजच्या काळातील घडामोडीत मिळू शकतात काय?

(2)

आता आपण दुसर्‍या टप्प्यात येऊ या! 1900 ते 2014! तात्यासाहेब महात्मा फुले, राजर्षी शाहू राजे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजक्रांतीची फळे चाखण्याचा हा काळ! अस्पृश्यता, जातीयता शिथिल होण्याचा वा अस्ताकडे जात असल्यालाचा हा काळ! जे ओबीसी वरातीत ब्राह्णांसोबत चालू शकत नव्हते, ते ओबीसी देशाच्या सर्वोच्च असलेल्या प्रधानमंत्री, राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसायला लागले. ज्ञान ऐकले तर कानात शिसाचा रस ओतणार, वाचले तर डोळे फोडले जाणार, सांगीतले तर जीभ कापली जाणार अशा शिक्षा ज्यांच्यासाठी होत्या ते ज्ञान कमविण्यासाठी परदेशात जाऊ लागले, डॉक्टर, वकील, प्रशासक होऊ लागलेत व घटनेचे शिल्पकार म्हणूनही प्रतिष्ठीत झालेत. जातीय बंधनातून मुक्त होऊन स्वतःच्या मताने ‘राजे’ निवडू लागलेत. सुवर्णकाळ आणण्यासाठी या पेक्षा वेगळे काय लागते? पण सुवर्ण काळ येता येता अंधकाःर कसा काय झाला? ब्राह्मणी प्रतिक्रांती कशी झाली? जाती नष्ट होता होता भक्कम कशा झाल्यात?

दोन्ही टप्प्यातील ब्राह्मणी प्रतिक्रांती सख्येने केवळ 2-3 टक्के असलेले लोक करू शकतात काय? दोन्ही टप्प्यातील ब्राह्मणी प्रतिक्रांतीला जबाबदार केवळ आणी केवळ बहुजन म्हणविणारे शुद्रातिशुद्रच! कारणे समानच आहेत. फक्त व्यक्ती वेगळ्या आहेत, संदर्भ वेगळे आहेत, घटना वेगळ्या आहेत मात्र प्रवृत्या त्याच आहेत. सत्यशोधक चळवळ ब्राह्मणी कॉंग्रेसकडे गहाण ठेवून स्वजातीपुरती सत्ता मिळविणारी ‘’क्षत्रिय-वतनदार प्रवृत्ती’’ त्याकाळी बौद्ध म्हणून मिरविणार्‍या एखाद्या समाजघटकात असणारच! बाबासाहेबांचे ‘’रिपब्लिकन’’ नाव घेऊन ब्राह्मण-क्षत्रियांच्या दारावर भिख मागणारी प्रवृती त्या बौद्ध काळातही कोणत्या तरी एखाद्या समाजघटकात असणारच! ‘ओबीसी नेता’ बिरूद लावून ब्राह्मण-क्षत्रियांच्या घरात पाणी भरणारी प्रवृत्ती त्या बौद्धकाळात कोणत्या तरी समाजघटकात असणारच! मंडल आयोगाचे गोड जेवण सोडून गटारीतले धार्मिक भोजन करण्यात धन्यता मानणारी प्रवृत्ती त्याही काळात कोणीतरी जिवंत ठेवली असणारच! भ्रष्टाचारापोटी अटक होण्याच्या भीतीने बहुजनांना वार्‍यावर सोडून ‘सर्वजन’ ब्राह्मणांना शरण जाण्याची प्रवृत्ती, बाबासाहेबांच्या हत्तीला ‘गणेश’ बनविण्याची प्रवृत्ती, त्याही काळातील एखाद्या बौद्ध महिलेत असणारच! निवडणुका जवळ आल्या की फुले पगडी व निवडणुका संपल्यावर पुन्हा पेशवा पगडी घालण्याची प्रवृती, भाजपाला शिव्या देऊन निवडणूकीत मते मिळविणारी व विरोधी बाकांवर बसूनही शत्रूपक्षाला 5 वर्षे सत्तेवर ठेवणारी लोकशाहीविरोधी प्रवृत्ती त्याही काळात जपणारे क्षत्रियवतनदार असणारच! देशातील मुख्य शत्रूपक्ष हे एकाच आईच्या पोटी जन्मलेले सख्खेभाऊ आहेत हे माहीत असूनही भाजपा नको म्हणून कॉंग्रेस व कॉंग्रेस नको म्हणून भाजपा उरावर घेणारी नेता-प्रवृत्ती त्या बौद्धकाळातील नेत्यांमध्ये असणारच! बाप कॉंग्रेसमध्ये, मुलगा शिवसेनेमध्ये, सुनबाई भाजपात व जावई बिल्डर-कारखानदार असे आदर्श कुटुंब त्याही बौद्धकाळात असणारच! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र करून मंत्रीपदाची भीख खाणारी दलित-प्रवृती त्या बौद्धक्रांतीच्या काळातही असणारच! बाबासाहेबांचा भक्कम वारसा लाभला असूनही व जनतेने नेता म्हणून स्वीकारले असूनही केवळ ‘ईगो’पायी समविचारी संघटना-पक्ष-व्यक्तींना ‘तुच्छ’ समजणारी नेता-प्रवृत्ती त्या बौद्ध भरभराटीच्या काळात असणारच!

शाळेचे नाव ‘‘सावित्रीबाई फुले कन्या शाळा’’ मात्र याच शाळेत ‘विद्येची देवता सरस्वती’ असे शिकविणारी शिक्षक-प्रवृत्ती त्या बौद्धकाळातही असणारच! छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सर्व कॉलेजेसमध्ये ‘’गोब्राह्मण प्रतिपालक’’ शिवाजी सांगणारी प्राध्यापक-प्रवृत्ती व या कॉलेजेसमध्ये फुले प्रणित ‘‘शिवाजी-उत्सव’’ साजरा करण्याऐवजी टिळक-प्रणित ‘’गणेश-उत्सव’’ साजरा करणारी संस्थाचालक-प्रवृत्ती त्या बौद्धकाळात असणारच!

(3)

एवढे सर्व दिसत असूनही केवळ ब्राह्मणांना शिव्या देणार्‍या पोस्ट फेसबुक-व्हाट्सपवर व्हायरल करून पुरोगामी (?) म्हणविणारे लोक त्याही काळात असणारच! या प्रवृत्या नष्ट होऊन खर्‍याखुर्‍या क्रांतीकारी प्रवृत्या जागण्याची वाट पाहू या व तो पर्यंत आपण एकमेकांना कडकडीत जयभीम-जयजोती करीत राहू या!

------- प्रा. श्रावण देवरे