Breaking News

शेतकर्‍यांनो पेरणीची घाई करू नका कृषी विभागाचे आवाहन


मुंबई - राज्यभरात मान्सूनचे आगमन होत असतानाच पेरणीच्या तयारीत असलेल्या शेतकर्‍यांकरिता कृषी विभागाने महत्त्वाचे आवाहन केले आहे. मान्सूनचा पाऊस 10 जूनपासून राज्यभर व्यापणार असला तरी 12 तारखेनंतर पावसामध्ये खंड पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीपाची पेरणी करत असताना घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाड्यात 12 जूनपर्यंत मान्सूनपूर्वीचा वादळी पाऊस पडेल. अशीच स्थिती मध्य महाराष्ट्रात असणार आहे. ढगाळ वातावरण राहणार असल्याने तापमानात घट होईल, मात्र 12 जुननंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे. योग्य पावसाची वाट पाहून नंतरच खरीपाची पेरणी करावी, असे कृषी विभागाने म्हटले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात 10 जूनपर्यंत तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या भागात 8 ते 9 जून या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही 9 आणि 10 जून रोजी मुसळधार पाऊस असेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तविला आहे.