Breaking News

डॉक्टर पलायनास जबाबदार पोलिसांची कारवाई शून्यच

सोलापूर, दि. 21, जून - वेळापूर येथे गर्भलिंग निदान व गर्भपात करणार्‍या डॉक्टरांना फरार होण्यास मदत करण्यात त्या दिवशी ड्युटीवर असणारे बरेच पोलिस अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. घटनेस नऊ दिवस उलटले तरीही पोलिस अधीक्षकांनी मात्र अद्याप कोणावरही कारवाई केलेली नाही. दरम्यान येथील फरार डॉक्टर दांपत्यासही अद्याप अटक झाली नसून, ते परदेशात निघून गेल्याची चर्चा आहे.

वेळापूर, ता. माळशिरस येथील आनंद मॅटर्निटी व सर्जिकल नर्सिंग होम व दोशी अल्ट्रासाउंड या दवाखान्यात डॉ. आनंद दोशी व डॉ. जयश्री दोशी हे दांपत्य बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात करत असल्याचे समजल्यानंतर सोमवार, दि.11 रोजी अकलूजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद जामदार व जिल्हा विधी समुपदेशक अ‍ॅड. रामेश्‍वरी माने यांनी पोलिसांच्या मदतीने या दवाखान्यावर छापा टाकला. डॉक्टर दोशी दांपत्यास पोलिसांच्या ताब्यातही दिले. दिवस मावळल्यानंतर महिलेस अटक करता येत नाही, या सबबीखाली डॉ. जयश्री दोशी यांना पोलिस बंदोबस्तात त्यांच्या घरीच ठेवले. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यातील डॉ. आनंद दोशी फरार झाले. घरूनही डॉ. जयश्री दोशी पोलिस बंदोबस्तातून फरार झाल्या. पोलिसांनी या दोन्ही डॉक्टरांना पळवून लावण्यात मदत केली. आर्थिक देवाण-घेवाण करून स्थानिक पोलिसांनी हे कृत्य केल्याचा आरोप रामेश्‍वरी माने यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रारीत केला होता.