Breaking News

महात्मा फुले यांच्या विचारामुळे राजकारणात आत्तापर्यंत मला प्रेरणा -छगन भुजबळ


पुणे - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारामुळे राजकारणात आत्तापर्यंत मला प्रेरणा मिळाली आहे. महात्मा फुले वाडा हा माझ्यासाठी पॉवर स्टेशन आहे. दरवर्षी या पॉवर स्टेशनला मी येत असतो. परंतु, मागील दोन वर्षांत मला येणे शक्य झाले नसल्याने आज त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याची भावना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रथम गंज पेठेतील महात्मा फुले वाड्याला भेट दिली. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ तुरुंगात असल्याने भुजबळांना वाड्यावर येणे शक्य झाले नव्हते.
या वेळी भुजबळ म्हणाले, तुरुंगात असतानाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फुले वाड्याच्या रखडलेल्या कामासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करीत होतो. तसेच माध्यमांनी देखील वाड्यासंदर्भात ज्या बातम्या प्रसिद्ध केल्या त्यामुळे सर्व माहिती मला मिळत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. तसेच फुले वाड्यात सुरू असलेल्या कामाची पाहणी त्यांनी केली. तर आज होणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावर ठोस भूमिका मांडेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.