Breaking News

परिचारिका पेशाला हवी प्रतिष्ठा - डॉ. अजय चंदनवाले


सोलापूर - परिचारिका या आरोग्यसेवेच्या मुख्य कणा असतात. त्यांच्या पेशेला प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे, अशी भूमिका पुण्याच्या ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी येथे मांडली. मानवी दृष्टिकोनातून रुग्णसेवा करणार्‍या परिचारिकांना करुणाशील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अ धिष्ठाता डॉ. सुनील घाटे अध्यक्षस्थानी होते. करुणाशील समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. राज्यभरातून आलेल्या दहा परिचारिकांचा या वेळी गौरव झाला. स्मृतिचिन्हे, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. तो स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना परिचारिकांना गदगदून आले. या पेशेला प्रतिष्ठा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. सुनीता पाटील, मेघा कुलकर्णी, संतोषी गोनेल, मुंबईच्या वैदेही मेमाणे, डॉ. नीलिमा सोनवणे, आकांक्षा नाईक, अकोल्याच्या मंगला जाधव, पुण्याच्या राजश्री कोरके, लातूरच्या छाया पोतदार, जळगावच्या कल्पना नगरे, वळसंगच्या कलावती चव्हाण यांचा या वेळी सन्मान झाला.