Breaking News

मुळा खोर्‍यात गावठी दारूच्या हातभट्टया अकोले शहरात विषारी ताडीची विक्री


अकोले / ता. प्रतिनिधी । 22 ः
तालुक्यातील मुळा खोर्‍यातील चास पिंपळदरी गावांमध्ये, गावठी दारूच्या हातभट्ट्या सर्रासपणे सुरु असून, या दारूच्या रसायनात विषारी केमिकलचा खुलेआम वापर केला जात आहे. याखेरीज अकोले बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या महात्मा फुले चौकात ताडीची बेकायदा विक्री सुरू असून, या ताडीमध्ये थेट झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या जात असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे. विषारी दारू व ताडीच्या सेवनाने अकोलेत नगर तालुक्यातील पांगरमलसारखे दारुकांड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील राजूर गाव परिसरात दारूविक्रीचा सर्वाधिक महापूर दिसून येतो. राजूर गावात गावच्या सरपंच तथा दारूबंदी चळवळीच्या प्रणेत्या हेमलता पिचड यांच्या पुढाकारातून दारूबंदी करण्यात आली. मात्र काही दिवसांनी राजूरमध्ये पुन्हा राजरोसपणे दारूची विक्री सुरू झाली. राजूर गाव हे आदिवासी डांगाण भागातील 40 गावांची मुख्य बाजारपेठ आहे. परिणामी राजूर गावात प्रतिदिन हजारो नागरिक दाखल होतात. हे नागरीक राजूरमध्ये दाखल झाले की, लगेचच दारूचे दुकान शोधतात. त्यामुळे राजूर भागात दारूविक्री अधिकच फोफावली आहे. राजूरसह इंदोरी, रुंभोडी, निळवंडे, पिंपळगाव नाकविंदा, म्हाळादेवी, समशेरपूर, गणोरे, लहित, अकोले शहरातील शाहूनगर परिसरात देशी दारूची विक्री अनेक वर्षांपासून सूरु असून, राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. मुळा खोर्‍यातील चास, पिंपळदरी या गावांच्या परिसरात व मुळा नदीच्या कडेला राजरोसपणे गावठी दारू तयार केली जात आहे. या परिसरातील नागरिकांचा गावठी दारुवरच उदरनिर्वाह अवलंबुन आहे. गावठी दारूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळवण्यासाठी सदरचे आदिवासी नागरिक, या दारूमध्ये विषारी केमिकल वापरतात. विषारी केमिकल वापरलेली गावठी दारू ही मानवी आरोग्यास अधिकच घातक आहे. तसेच अकोले शहरातील महात्मा फुले चौक व कारखाना रोड परिसरात अनधिकृत ताडीची दोन दुकाने आहेत. या ताडीच्या दुकानामध्ये आदिवासी ठाकर समाजातील लोकांसह प्रतिष्ठित नागरिकांचा मुक्त वावर असतो. परंतु ताडी अधिकच परिणामकारक होण्यासाठी या ताडीत थेट झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या जातात. परिणामी नागरिकांना लगेचच गुंगी येते. या विषारी ताडी व गावठी दारूमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदरचे दुकानदार ताडी व दारूविक्रीतून गब्बर झाले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांनी व स्थानिक पोलिसांनी आपले अर्थपूर्ण संबंध बाजूला ठेवून नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा दुकानदारांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.