दरोडेखोरांना पोलिसांनीं केले जेरबंद
कोपरगाव शहर प्रतिनिधी
दरोड्याच्या तयारीत असलेल्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करून गजाआड केले. पोलिसांनी या दरोडेखोरांच्या ताब्यातून धारदार चॉपरसह लोखंडी फायटर, मोबाईल असा सुमारे ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.
शहरातील चोरी, घरफोडी यासारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी अधिकाऱ्यांना गुन्हेगारांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र असे असतानाच शुक्रवारी {दि. १५ } रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नागपूर मुंबई महामार्गावर पेट्रोलपंपाजवळ कोकमठाण शिवारात दरोडे टाकणारी टोळी प्रवाशांना लुटत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांच्या पथकाला समजली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक भारत मोरे, पोलिस कॉन्स्टेबल आर. बी. भोर, एम. एम. पाखरे. ए. आर. वाघ यांनी सापळा रचून छापा टाकला. आकाश चंदूसिंग परदेशी {रा. सावळीविहीर}, प्रविण गंगाधर पवार, {रा. शिर्डी}, ज्ञानेश्वर किसन इंगळे {रा. सावळीविहीर} अशी या दरोडेखोरांची नावे आहेत. या गुन्हेगारांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
