सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी अहोरात्र झटणार - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
कोपरगाव शहर प्रतिनिधी
साईबाबांचा आशिर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छांमुळे आपण आज जनतेसमोर उभे आहोत. इतर मागासवर्गीयांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी याही वयात लढाई सुरू आहे. ती अशीच यापुढेही सुरूच ठेवणार आहे. सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी अहोरात्र झटणार आहे, असा निर्धार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येथील संजीवनी उद्योग समुहालगतच्या धोंडिबानगरातील साईधाम मंदिराच्या १९ व्या वर्धापनदिनास छगन भुजबळ यांच्यासह माजी खा. समीर भुजबळ यांनी भेट दिली. त्याप्रसंगी आ. स्नेहलता कोल्हे याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. येथील साईधाम मंदिराचा शनिवारी {दि. १६} वर्धापनदिन होता. त्यानिमित्त येथे देशविदेशातील साईभक्त दर्शनासाठी जमले होते. अचानकपणे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील या स्थानांस भेट देऊन साईंचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या स्नुषा आणि कोपरगांव विधानसभा मतदारसंघाच्या आ. स्नेहलता कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समुह, मतदार संघ व कोल्हे परिवाराच्यावतीने तसेच साईधाम ट्रस्टच्यावतीने त्यांचा सत्कार केला.
साईधाम मंदिर वर्धापनदिनानिमित्त पहाटेपासून विविध अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, संगणकतज्ञ विजय भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संजीवनी कारखान्यांचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, कोपरगांव औदयोगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष दिलीप वाघ, साईधामचे सुरेश चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी आदींसह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि साईभक्त उपस्थित होते. शेवटी भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी आभार मानले.
