Breaking News

घरकुलांच्या मंजूरीच्या दुसर्‍याच दिवशी अधिकार्‍यासमवेत खा. उदयनराजे पाहणीसाठी

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) : गेंडामाळाजवळील माजगांवकर माळावर पंतप्रधान आवास योजना साकार करण्यासाठी नगरपरिषदेच्या मालकीची जागा आहे. सर्वांना परवडणारी घरे प्रदान करणे याठिकाणी शक्य आहे, म्हाडाचे अधिकारी, पंतप्रधान आवास योजनेचे महत्व आणि वैशिष्ट्ये समजावून सांगण्यासाठी व योजना पडताळीसाठी माजगांवकर माळ या ठिकाणी आले आहेत. संबंधीतांनी नागरीकांना योजनेची परिपूर्ण माहीती आणि शंका समाधान त्यांचेकडून करुन पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गंत घरे उभारण्याच्या म्हाडाच्या उपसरव्यवस्थापिका वैजयंती महाबळे यांच्या समवेत, माजगांवकर माळ येथील जागेची पहाणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली त्यावेळी ते लोकांना संबोधित करताना औपचारिक बोलत होते.
पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातुन एकूण 1 हजार 958 घरांच्या प्रस्तावाला कालच केंद्र शासनाने मंजूरी दिल्यावर, प्रत्यक्ष प्रकल्पाचे आर्थिक नियोजनाकरीता म्हाडाच्या उपसरव्यवस्थापिका वैजयंती महाबळे यांनी प्रत्यक्ष भेट दिली. त्यानी योजनेची विस्तृत माहीती देताना, किती स्केअरफुटांचे घर मिळणार तसेच लाभार्थी हिस्सा, नगरपरिषदेचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा याबाबत नागरीकांना मार्गदर्शन केले.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गंत ज्याला स्वतःचे निवासस्थान नाही अशा सर्वांना सामावून घेण्याचा नगरपरिषदेचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करुन दिला जाईल. घरांबरोबरच मुलभुत नागरी सुविध जसे की, अंतर्गंत रस्ते, गटर्स, दिवाबत्ती, पाणी या सुविधा मिळणार असल्याने, माजगांवकरमाळ रहिवाशांनी योजनेचे महत्व लक्षात घेवून यामध्ये सहभागी व्हावे, सातार्‍याबरोबरच कराड, वाई नगरपरिषदांच्या हद्दीत ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्याकरीता केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.
यावेळी नगरसेवक डि. जी. बनकर, मुख्याधिकारी शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, जितेंद्र खानविलकर, प्रताप शिंदे, ठेका अभियंता अनंत प्रभुणे व म्हाडाचे क्षेत्रिय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, कालच मंजूर केलेल्या या योजनेच्या दृष्टीने आज सर्वेक्षण करण्यात आल्याने, पंतप्रधान आवास योजना वेगाने पूर्ण होण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्वतः लक्ष घातले आहे. त्यामुळे मोठ्या गतीने पंतप्रधान आवास योजनेची घरे साकार होतील, अशी चर्चा माजगांवकरमाळा परिसरातील नागरिकांमध्ये सुरु होती.