शिंगणापूर ट्रस्ट ताब्यात घेण्याच्या जोरदार हालचाली!
अहमदनगर प्रतिनिधी : देव आहे, मात्र देवाला मंदीर नाही, घरे आहेत, परंतू त्या दारांना कडी-कोयंडे नाहीत, असे मुलखावेगळे शनिशिंगणापूर हे जगभर सुपरिचित असे देवस्थान आहे. देशभरातून व विदेशातूनही या देवस्थानाला भेट देण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. परंतू आता शनिशिंगणापूर हे देवस्थान एका वेगळ्याच विषयावर चर्चेचा विषय बनले आहे. महाराष्ट्र शासनाने मोठमोठे देवस्थान स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी हळूहळू हालचाली सुरु केल्या आहेत. आता शनिशिंगणापूर देवस्थानदेखील ताब्यात घेण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरु केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदेश दौऱ्याहून आल्यानंतर या प्रस्तावावर सही करणार आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांमार्फत हाती आली आहे.
राज्यशासनाने यापूर्वीही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सरकारी प्रशासक नेमला आहे. त्याचा पद्धतीने शनिशिंगणापूर ट्रस्टवरही सरकारी प्रशासक बसविणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका व कॅनडाच्या दौर्यावर गेले आहेत. तत्पूर्वी शनिशिंगणापूर ट्रस्ट ताब्यात घेण्यासाठी त्यांनी हालचाली सुरु केलेल्या आहेत. शनिशिंगणापूर ट्रस्ट प्रशासनावर सरकारी प्रशासक बसविण्यासाठी दस्तावेज व्यवस्थित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अमेरिकेचा दौरा करून परतल्यानंतर मुख्यमंत्री या प्रस्ताववर सही करून सदर प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत मंजूर करून घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंदिर ट्रस्ट मॅनेजमेंटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सरकारी प्रशासक नेमण्यात यावा. शनिशिंगणापूर हे अत्यंत धार्मिक स्थळ आहे. लाखो भक्त शनिशिंगणापूरला देवदर्शनासाठी येतात. तेव्हा त्यांची मॅनेजमेंट उच्चस्तरावर होईल. सरकारी मदत घ्यायची असल्यास सरकारचा प्रशासक नेमायला हवा. शासनाने ट्रस्ट हाती घेतल्यानंतर भाविकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. जेव्हा राज्य सरकारतर्फे शनिशिंगणापूर ट्रस्टचा कारभार हातात घेतला जाईल, तेव्हा एका अधिकार्याची नेणूमक होईल, हा अधिकारी दर दिवसाला प्रशासकीय काम पाहिल. मंदिराच्या ट्रस्टतर्फे त्यांचा स्वत: काही स्टाफ असणार आहे. पण राज्य सरकारतर्फे मुख्य चेअरमन, व्हा. चेअरमन आणि विश्वस्तांची नेमणूक होईल. ज्याप्रकारे श्रीगणेशाच्या सिध्दीविनायक ट्रस्टला आणि श्री शिर्डी साईबाबा संस्था आणि ट्रस्टला सरकारी प्रशासक नेमणूक कायदा व सुव्यवस्था पाळणे कायदेशीर केले आहे, तसेच शनिशिंगणापूरला लागू होतील.
सरकारी निधीसाठी आवश्यक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय चांगला आहे. कोणतेही मंदिर पुजार्याच्या व ट्रस्टच्या हातात जाता कामा नये. मंदिर परिसरात काहीही करायचे ते कायद्याने करावे. जेणेकरून भाविकांना चांगल्या सुविधा देणे सरकारीपातळी प्रयत्न करणे सोपे होईल. सरकारी निधीसाठी हे करणे आवश्यक आहे.
पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यंमत्री.
प्रस्ताव आल्यानंतर पाहू
यासंदर्भात शनिशिंगणापूर ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांना विचारले असता ते म्हणाले, अशा कोणत्याही प्रस्तावाबाबत आमच्याकडे माहिती आलेली नाही. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. जेव्हा हा प्रस्ताव मंजुरीसाठी येईल, तेव्हा पाहूया.