Breaking News

अकोल्यात दुध दरवाढिसाठी कम्युनिष्ट पक्षाचे आंदोलन ...दुध ओतुन केले आंदोलन

शेती परवडत नाही, त्यातच आता दुधाला ही कवडी मोल भाव मिळत असल्याने वैतागलेल्या शेतकर्‍यांनी कम्युनिष्ट पक्षाच्या छत्राखाली येवून आज अकोल्यात शासनाचा शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करत उग्र स्वरूपाचे आंदोलन दुध ओतुन केले. या आंदोलनासाठी अकोले तालुक्यातील शेतकरी स्वयंस्फुर्तीने प्रचंड संख्येने सहभागी झाले होते. तळपत्या आणि रखरखत्या ऊन्हाचे चटके सोसत शेतकर्‍यांनी सरकार विरोधात घोषणा देऊन अकोले दणाणून सोडले. डॉ. अजित नवले यांनी हे सरकार फसवे आणि लबाड असल्याचे सांगितले. शेतकरी जगला पाहिजे तो वाचला पाहिजे, म्हणुन कोणीही काम करतांना दिसत नाही. दुधाला मिळणारा बाजार भाव हा, शेतकर्‍याला परवडत नाही. वाढलेले खाद्यांचे बाजारभाव आणि त्या तुलनेत दुधाला मिळणारा भाव हे सुत्र जमत नाही. प्रचंड तोटा सहन करून शेतकरी जनावरांचा सांभाळ करत आहे. अ‍ॅड. शांताराम वाळुंज यांनी शेतकर्‍यांची व्यथा मांडतांना प्रभावी भुमिका मांडली. हे भाजपचे सरकार घोषणाबाज सरकार असुन शेतकरी विरोधातले आणि भांडवलदार धार्जिणे आहे. वारंवार शेतकर्‍यांना आपल्या मागण्यांसाठी सरकारविरोधात रस्त्यावर यावे लागत आहे. संवेदनाहिन सरकारचा कडेलोट करणे काळाची गरज असल्याचे शांताराम वाळुंज यांनी सांगितले. युवा नेते महेश नवले, विलास आरोटे, डॉ. संदिप कडलग यांनी आंदोलनाचे नियोजन केले. प्रचंड ऊन्हाचे चटके सोसत शेतकरी या आंदोलनात शेवटपर्यंत सरकारविरोधात आपला रोष व्यक्त करत होता.