Breaking News

खा. सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत उपचार शिबिर

कोपरगाव ता. प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी {दि. ३० } कोपरगाव येथे विविध आजारांवर मोफत उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली.

यानिमित्त येथील कृष्णाई मंगल कार्यालयात शनिवार सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार शिबिर होणार आहे. या शिबिरात हृदयविकार, मेंदूविकार, मधुमेह, दमा, छातीचे (श्वसनाचे) विकार, नेत्रचिकित्सा, दंतरोग आदी विकारांची मोफत तपासणी करून औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. या मोफत उपचार शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांकडून विविध आजारांवर यशस्वी उपचार करून रुग्णांना वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे. समाजातील जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी आरोग्याची तपासणी करून या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.