Breaking News

माजी खा. गडाखांची पुन्हा ‘राष्ट्रवादी’कडून ‘फिल्डिंग’?


अहमदनगर / बाळासाहेब शेटे 
प्रस्थापितांचे कट्टर विरोधक, राज्यघटना, कायदा, धर्मकारण, राजकारण, अध्यात्म या आणि अन्य अनेक क्षेत्रात मजबूत पकड असलेल्या माजी खा. तुकाराम गडाख यांची पावले कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळू लागली आहेत. लोकसभा नाही तर विधानसभा किंवा दोन्हीही निवडणूका लढविण्यासाठी गडाखांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. अलीकडे माजी खा. गडाख हे सोशल मिडियावर कमालीचे सक्रिय झाले आहेत. ‘फेसबुक’वर त्यांच्या ‘पोस्ट’ पाहून त्यांचे तरुण, युवा आणि प्रौढ अशा सर्वच वर्गातील कार्यकर्ते नेवासा तालुक्यात गडाखांचा ‘झंझावात’ पुन्हा येण्याची वाट पाहत आहेत.

माजी खा. गडाख यांचा राजकीय जन्मच मुळी तालुक्यात जे प्रस्थापित राजकारणी आहेत, त्यांच्या विरोधातून झाला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, स्व. मारुतराव घुले आदींचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते गडाख हे आजमितीस तालुक्याच्या राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे माजी खा. गडाख यांचा आताच्या राजकारणाचा नक्की विरोधक कोण असणार, त्यांचे प्रचाराचे मुद्दे काय असणार, ते कोणाला ‘टार्गेट’ करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतः माजी खा. गडाख यांनी दिल्याशिवाय मिळणे अशक्य आहे. दरम्यान, आगामी काही दिवसांत सोनईत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात माजी खा. गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, यासंदर्भात माजी खा. गडाख यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो न झाल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.