नगरपरिषदेची प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई
संगमनेर : संगमनेर नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतून प्लास्टिक, थर्माकोल किंवा अविघटनशील वस्तूंचा उत्पादन, विक्री व वापरास बंदी घातली होती. मात्र असे असतानादेखील शहरातील काही व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या त्याचबरोबर इतर अविघटनशील वस्तूंची विक्री सुरु असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. याविरोधात नगरपरिषदेकडून महाराष्ट्र प्लास्टिक व अविघटनशील कचरा कायदा २००६ नियमानुसार अशा व्यापाऱ्यांवर आज दंडात्मक कारवाई करण्यात आली, अशी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली.
प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन केलेल्या एकूण सहा व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यापोटी ३५ हजार रुपयांचा दंड परिषदेने वसूल केला. त्याचबरोबर शहरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन न करता केवळ कापडी पिशव्यांचा वापर करावा. अन्यथा यापुढील काळात प्लास्टिकविरोधी मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार येईल, असा इशारा मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी दिला.
