Breaking News

पंतप्रधान आवास योजनेला लागली घरघर !


शेवगाव प्रतिनिधी

पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘घरकुल’ योजनेकडे लाभार्थ्यांनीच पाठ फिरविली की काय, असा प्रश्न आज संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे या चांगल्या योजनेला घरघर लागली आहे 

तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना २०१७/१८ मध्ये लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार लाभार्थ्यांची ‘स्थळ निश्चितीकरण’ करून कामाची सुरुवात करण्यात आली. अनेक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जागा नसल्याने मोठी कसरत करावी लागली. याकामी शेवगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्णय घेत या योजनेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. परंतु अनेक स्थानिक लाभार्थ्यांनी या योजनेला सुरुवातीच्या काळात दाखविलेला उत्साह नंतर कायम ठेवलला नाही. त्यामुळे सदर योजेनच्या नंतरच्या कामाला आडकाठी निर्माण झाली.

विशेष म्हणजे या कामाकडे अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. परंतु लाभार्थ्यांनी मात्र या योजनेतील दोन- तीन हप्ते घेऊन या योजनेतील घरकुले पूर्ण न करता कामे अर्ध्यावर सोडली आहेत. त्यामुळे शेवगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. ठराविक लाभार्थ्यांच्या नाकर्तेपणामुळे या योजनेला काहीशी खिळ बसली आहे.

चौकट

अर्धवट राहिलेले घरकूल पूर्ण करा 

सुरुवातीला ‘घरकुल’ योजना मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. त्यानुसार घरकुलाचे तीन टप्पे करण्यात आले. या तिन्ही टप्प्यात वेगवेगळी रक्कम खात्यात जमा करण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला. त्यानुसार तशी तरतूदही पंचायत समितीने केली. त्यानुसार पहिला व दुसरा टप्पा करून रक्कम जमा करण्यात आली. परंतु लाभार्थ्यांनी नंतर या योजनेकडे सोयीस्कररित्या पाठ फिरवली. मात्र संबंधित गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन लवकरात लवकर आपले अर्धवट राहिलेले घरकूल पूर्ण करावे. 

अशोक भवारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती.