Breaking News

रिफायनरीविरोधात 8 जून ला ’स्वाभिमान’चा मोर्चा

सिंधुदुर्गनगरी, दि. 03, जून - रिफायनरी प्रकल्पाला लागणार्‍या पाण्यासाठी आणखी 15 गावांचा बळी घेतला जात असल्याच्या निषेधार्थ आणि रिफायनरीच्या प्रकल्पाविरोधात भव्य एल्गार उभारण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून येत्या 8 जूनला देवगडमध्ये आ. नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली देवगड तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. स्वाभिमानचे देवगड तालुकाध्यक्ष संदीप साटम यांनी हि माहिती दिली.

नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी लागणा-या पाण्यासाठी विजयदुर्ग खाडीवर तारळ-मणचे येथून खारेपाटणपर्यंत भलेमोठे धरण उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी अगोदरच 17 गावांतील जनतेवर टांगती तलवार असतानाच आता या धरणामुळे आणखी 15 सधन गावांचा बळी देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी साटम यांनी केला. या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना राज्य शासनातील दोन्ही राजकीय पक्ष आम्ही जनतेच्या बाजूने आहोत असे सांगून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. शासन प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाकडे दुर्लक्ष करत रिफायनरी प्रकल्पासाठी लागणा-या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विजयदुर्ग खाडीवर धरण बांधण्याचा प्रयत्न शासन पातळीवर सुरू झाला आहे. या धरणासाठी अजून 15 सधन गावांचा बळी देण्यात येणार आहे. विजयदुर्ग खाडीवर तारळ, मणचे येथून खारेपाटण पर्यंत भलेमोठे धरण बांधून नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी लागणा-या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. रिफायनरी बरोबरच धरण बांधण्याचा डावही मोडीत काढण्याचा निर्धार या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे अशी माहिती साटम यांनी दिली.
रिफायनरी प्रकल्पासाठी पाण्याची व्यवस्था उभारण्याकरता विजयदुर्ग खाडीवर धरण बांधण्यासाठी खारेपाटण व देवगड तालुक्यातील कुणकवण, कोरले, धालवली, पाटगाव, पोंबुरले, मणचे, मालपे ही गावे धरणासाठी तसेच पाळेकरवाडी, मुटाट, सौंदाळे, बापर्डे गावे व राजापूर तालुक्यातील अन्य काही गावे प्रकल्पासाठी घेतली जाणार आहेत. तरी या गावातील सर्वांनी 8 जून ला महाराष्ट्र स्वा भिमान पक्षाकडून देवगड तहसील कार्यालयावर काढण्यात येणार्‍या भव्य मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायत समिती सदस्य रवी पाळेकर यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.