Breaking News

बँकेतील काऊंटरवरून 50 हजारांची रोकड लंपास

सातारा, दि. 20, जून - जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर स्लीपमध्ये खाते नंबर टाकत असताना काऊंटरवर ठेवलेली 49 हजार 500 रुपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, भरदिवसा बँकेत घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.महेंद्र रामकृष्ण निकम (वय 34, रा. मि. अपशिंगे) यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महेंद्र निकम हे एचडीएफसी बँकेत 1 लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी गेले होेते. बँकेत गेल्यानंतर दोन स्लिप घेवून त्यांनी त्या भरल्या. कॅश काऊंटरवर आल्यानंतर हातातील पैशांचे दोन बंडल त्यांनी ठेवले. यावेळी एका स्लिपमध्ये खाते क्रमांक टाकायचे राहिले असल्याचे निकम यांच्या लक्षात आले.तक्रारदार महेंद्र निकम हे दुस-या स्लिपमध्ये खाते क्रमांक टाकत असताना अज्ञात चोरटा पाठीमागून आला व त्याने दोन रोखीच्या बंडलपैकी एक बंडल उचलला व तेथून निघून गेला. हा प्रकार लक्षात येताच महेंद्र निकम यांनी आरडाओरडा करत त्या संशयिताचा पाठलाग केला. तोपर्यंत संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला. निकम यांनी बँके च्या सुरक्षा रक्षकाला व बँक प्रशासनाला याबाबतची माहिती दिल्यानंतर तत्काळ शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सीसीटीव्हीची पाहणी करुन तपासासाठी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, भरदिवसा बँकेत घडलेल्या या घटनेमुळे बँक सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.