नळ-ड्रेनेज जोडणी आता ऑनलाईन पद्धतीने - अविनाश ढाकणे
सोलापूर, दि. 20, जून - महापालिकेकडून यापुढे नळ-ड्रेनेज जोडणी आता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. नळ वा ड्रेनेज जोडणीचे काम झोन कार्यालयाकडून केले जाते. मनपाकडे याबाबत आवश्यक यंत्रणा नसल्याने परवानाधारक प्लंबरकडून नळ-ड्रेनेज जोडणीचे काम करवून घेण्यात येते. पण हे करीत असताना रितसर पावतीच्या रकमेपेक्षा जादा रक्कम मिळकतदारांकडून वसूल केली जाते. याद्वारे मिळकतदारांची एकप्रकारे लूट होते. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात असल्याबाबत आयुक्तांचे लक्ष वेधले असता त्यांनी यापुढे नळ-ड्रेनेज जोडणीचे काम ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल, असे सांगितले. मिळकतदारांनी नळ-ड्रेनेज जोडणी ऑनलाईन अर्ज करावा. पुढील सोपस्कर झाल्यानंतर भरलेल्या रकमेची पावती ही झोन कार्यालयाला दाखवून जोडणीचे काम करुन घ्यावे. जादा पैशाची मागणी कोणी केल्यास देऊ नये. एखादा प्लंबर जर जादा पैशाची मागणी करीत असेल तर मनपाकडे तक्रार करावी. अशा प्लंबरचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
