Breaking News

पाणी फाऊंडेशनच्या कामाचे सर्वत्र कौतुक; आता प्रतिक्षा वरूण राजाची तालुक्यातील 41 गावांंच्या प्रतिनिधींनी घेतले होतं प्रशिक्षण

कर्जत / प्रतिनिधी । तालुक्यात दीड महिन्यांपासून पाणी फाऊंडेशन अंतर्गत मोठे काम उभे राहिले. भारतीय जैन संघटनेने पुढाकार घेऊन उभारलेली श्रमदान चळवळ विशेष गाजली. संघटनेने दिलेल्या मशीनमुळे तालुक्यात 12 लाख घन मीटर काम झाले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठणार असल्याने आता सर्वांना फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या गेली दीड महिना केलेल्या कामामुळे अनेक जण भारतीय जैन संघटनेसह सर्वच सामाजिक संघटना अधिकारी यांचे कौतुक करत असून, पाणी फौंडेशनला धन्यवाद देत आहेत.

कर्जत तालुक्यात पाणी फौंडेशनच्या स्पर्धेसाठी 41 गावांनी आपले प्रतिनिधी पाठवून प्रशिक्षण घेतले होते. मात्र स्पर्धा सुरु होण्याअगोदरच 10-12 गावांनी स्पर्धेत भागच घ्यायचा नाही असे ठरवून टाकले होते. उर्वरित गावातील बहुतांशी गावात काम उभे राहण्यासाठी व ते सातत्यपूर्ण पुढे चालू राहण्यासाठी भारतीय जैन संघटनेसह काम केलेल्या सर्वच यंत्रणांना मोठी मेहनत घ्यावी लागली. कर्जत तालुक्यात जी गावे 15 गूण पूर्ण करतील त्या गावांना मशिनरी देण्यासाठी व या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी अगोदरच येथील आशिष बोरा यांची प्रकल्प संचालक म्हणून नेमणूक केली. त्यांनी कर्जत तालुक्यातील जैन संघटनेला बैठका घेऊन या कामाचे महत्व पटवून दिले. यामध्ये त्यांना भारतीय जैन संघटनेच जिल्हाध्यक्ष नवीन बोरा व कर्जतचे अध्यक्ष अभय बोरा यांनी विशेष सहकार्य केले. स्पर्धा 8 एप्रिलला सुरु झाली. तीन गावात प्रमुख अधिकार्‍यांसह उद्घाटने झाली. दोन दिवस तालुक्यातील गावाचा आढावा घेतला असता, तीन चार गावेच काम करण्यास उत्सुक होती, इतर गावात काम सुरु झाले नव्हते, अशा वेळी बिजेएस च्या पदाधिकार्‍यांनी कर्जत येथे तालुक्याचे प्रमुख अधिकारी व विविध सामाजिक संघटनाना एकत्र करत बैठक घेतली. त्यांचे समोर दररोज एक तास श्रमदान करण्याची संकल्पना विशद केली. यावेळी उपस्थित तहसीलदार किरण सावंत, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांचेसह रोटरीचे नितीन देशमुख, डॉ. राजेंद्र खेत्रे यांनी याचे महत्व ओळखून त्वरित बिजेएस बरोबर स्वत: या श्रमदानात उतरण्यास दुजोरा दिला. दुसर्‍या दिवसापासून सकाळी 6 ते 7 एक तास एका गावात जाऊन श्रमदान करायचे, गावातून प्रभात फेरी काढायची व जमलेल्या ग्रामस्थांचे प्रबोधन करायचे अथवा जेथे चांगले काम सुरु आहे, तेथे प्रोत्साहन द्यायचे असे काम शेवटच्या दिवसापर्यंत केले. तालुक्यात सामाजिक संघटनांनी उभारलेल्या या चळवळीला सर्व 
उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे जेथे शक्य असेल तेथे सहभागी होत होत्या, तर तालुक्याचे तहसीलदार किरण सावंत, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी मात्र सातत्यपूर्ण सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष कामाचे ठिकाणी हे अधिकारी सर्वाशी अगदी मित्रत्वाने राहिल्याने खर्‍या अर्थाने ही लोक चळवळ झाली. प्रशासनाने शासनातर्फे दिल्या गेलेल्या
मशिनरीसाठी डीजेलच्या मदतीसाठीचे दीड लाख रुपये त्वरित मिळवून देण्यासाठी विशेष मदत केली. या श्रमचळवळीचे व्यवस्थापन करत असताना भारतीय जैन संघटना तालुक्यातील व तालुक्याच्या बाहेरील मशीन मालकांशी सतत
संपर्कात होते. जास्तीत जास्त मशीन तालुक्यात लावण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. यासाठी संघटनेने नियुक्त केलेले तालुका समन्वयक शरद थोरात हे सर्व गावाच्या सरपंचांच्या संपर्कात राहून मशिनरी पुरविण्याचे काम तत्परतेने करत होते.


गावाने 15 मार्क पूर्ण केले की लगेच त्याच दिवशी पोकलेन अथवा जेसीबी दिला जात होता. कर्जत तालुक्यात गोंदरडी -200 तास पोकलेन, डिक्सळ - 540 तास पोकलेन, टाकळी -450 तास पोकलेन, बजरंगवाडी - 112
तास पोकलेन, चापडगाव - 432 तास जेसीबी, आळसुंदा - 292 तास जेसीबी,
कुंभेफल -120 तास पोकलेन व 370 तास जेसीबी, राक्षसवाडी -100 तास पोकलेन,
दुर्गाव - 409 तास पोकलेन, मुळेवाडी - 300 तास पोकलेन, खांडवी -194 तास
पोकलेन, कौडाने -84 तास पोकलेन, दि. 22 मे 2018 अखेर कर्जत तालुक्यात 12
गावांमध्ये 2509 तास पोकलेन तर 1094 तास जेसीबीचे काम झाले. यामाध्यमातून
तालुक्यात या गावामध्ये श्रमदानाद्वारे 34971 घन. मीटर काम केले असून,
मशिनरीद्वारे 11 लाख 38 हजार 870 घन मीटर काम करण्यात आले आहे.



या सर्व पाणी फौंडेशनच्या चळवळीत गेली काही महिने तालुक्यात समन्वयक म्हणून काम पाहणारे योगेश अभंग, व अमोल लांडगे यांचेसह त्यांचे सहकारी जयदीप जगताप, बाळासाहेब बगाटे, अपेक्षा सुपेकर, मगेश
पीचङ, बाळासाहेब पाङे यांनी विशेष मेहनत घेत, जी गावे काम करत होती त्या
त्या गावांना दिवस रात्र एक करत मदत केली. कर्जत तालुक्यांच्या कामकाजाचे प्रेझेन्टेशन या
चळवळीचे प्रणेते पाणी फौंडेशनचे सर्वेसर्वा अमीर खान व किरण राव यांचे
समोर धुळे येथे तर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांचे
समोर नगर येथे करण्याची संधी बिजेएसचे तालुका प्रकल्प संचालक आशिष बोरा
यांना मिळाली. राज्याचे जल संधारणमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या मतदार संघात प्रभावी काम करण्याचे आवाहन असताना, त्यांनाही राज्यात अभिमानाने सांगता येईल असे काम तालुक्यात उभे राहिल्याचे पहावयास मिळत असून ना. राम शिंदे यांनी राक्षसवाडी, दुर्गाव, टाकळी, चापडगाव अशा विविध ठिकाणी भेटी देऊन या कामाची पाहणी केली, व कामाचे कौतुक केले.