Breaking News

वर्सोवा समुद्र किना-यावरील 40 अनधिकृत झोपड्या हटविल्या

मुंबई, दि. 20, जून - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील समुद्र किना-यांपैकी ’वर्सोवा बीच’ या नावाने सुविख्यात असणारा वेसावेचा समुद्र किनारा हा एक महत्त्वाचा समुद्र किनारा आहे. याच समुद्र किना-यावर काही अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे उद्भवली होती. प्रामुख्याने झोपड्या असणा-या या तात्पुर-या बांधकामांचा वापर निवासी कारणांसाठी केला जात होता. या अनधिकृत बांधक ामांवर / अतिक्रमणांवर मुंबई पोलीसांच्या मदतीने धडक कारवाई करुन सर्व 40 झोपड्या आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान निष्कासित करण्यात आल्या आहेत. या कारवाई दरम्यान 6 सिलिंडर्स, 20 ड्रम यासह भांडीकुंडी व इतर साहित्य देखील मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहे. परिमंडळ - 4 चे उपायुक्त श्री. किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे वर्सेावा समुद्र किनारा अधिक स्वच्छ व मोकळा होण्यास मदत झाली आहे, अशी माहिती ’के पश्‍चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.
महापालिकेच्या ’के पश्‍चिम’ विभागांतर्गत जुहू, जोगेश्‍वरी (प.), अंधेरी (प.), विलेपार्ले (प.), जुहू समुद्रकिनारा, ओशीवरा यासह वर्सेावा व वर्सेावा समुद्र किनारा इत्यादी परिसरांचा समावेश होतो. वर्सेावा समुद्र किना-याजवळील ’सागर कुटीर’ जवळ 40 अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे उद्भवली होती. ही अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यासाठी मुंबई पोलीस दलाचे विशेष सहकार्य महापालिकेला लाभले. 20 पोलीसांचा ताफा या कारवाईदरम्यान घटनास्थळी तैनात होता. या कार्यवाहीसाठी 1 जेसीबी, 1 डंपर, 2 लॉरी व इतर आवश्यक साधनसामुग्री वापरण्यात आली. या क ारवाईत महापालिकेचे 30 कामगार - कर्मचारी - अधिकारी सहभागी झाले होते, अशीही माहिती गायकवाड यांनी दिली आहे.