Breaking News

दुध उत्पादक शेतकर्‍यांचे 27 रोजी आंदोलन

सिंधुदुर्ग, दि. 20, जून - गोकुळ दूध संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाईचे दूध घेणे बंद केले आहे. त्यामुळे दरदिवशी पाच हजार लिटर दूध वाया जाऊन हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. याचा निषेध नोंदवत शासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने येत्या 27 जूनला ओरोस रवळनाथ मंदिरात दुधाचा अभिषेक व मोफत दूध वाटून आंदोलन छेडण्याचा निर्णय जिल्ह्यातील दूध उत्पादन संघ व शेतक-यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळकडून 2013 पासून सिंधुदुर्ग जिल्हयात दूध संकलन केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कर्जे काढून दुधाळ जनावरे घेतली व दूध व्यवसायात वाढही केली आहे. परंतु गोकूळ दूध संघाने 11 जूनपासून सिंधुदुर्ग जिल्हयातील दूध संस्थांचे संकलन स्वीकारणे बंद केले आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दूध उत्पादक संघ व शेतकरी यांची बैठक जिल्हा बँकेच्या सभागृहामध्ये घेण्यात आली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ न सावंत यांनी माहिती दिली. 
येत्या 27 जून रोजी सकाळी 10 वाजता ओरोस रवळनाथ मंदिरामध्ये सर्व दूध उत्पादक व शेतकरी एकत्र येऊन ओरोस रवळनाथाला दुधाचा अभिषेक करणार आहेत. मोफत दुधाचे वाटप करून आंदोलन केले जाणार व जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले जाणार आहे. या आंदोलनात दूध संघ व शेतक-यांबद्दल आस्था असणा-या सर्वपक्षातील पदाधिकारी, नेतेमंडळी, कार्यकर्ते व शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.