Breaking News

रमजान विशेष भाग... 3 कर्माची साक्ष प्रत्येक अवयव देईल

रमजान महिना आपल्या उत्तरार्धाकडे आगेकूच करीत आहे. 22 दिवस कसे निघून गेले ते कळलेदेखील नाही. सदाचार, सद्वर्तन, सत्याची अनुभूती देणारा, पुण्यकार्यासाठी प्रवृत्त करणारा, वाईटांपासून रोखणारा, दीन-दलित, पतित यांच्या प्रति दयालुता बाळगण्यास भाग पाडणारा असा हा महिना लवकरच संपणार आहे. मात्र हा महिना वर्षभराच्या प्रशिक्षणाचा महिना आहे. या महिन्यात ज्याप्रमाणे आपण अल्लाहच्या प्रती श्रद्धा ठेवून त्याची आराधना (ईबादत) करतो तशी ती वर्षभर करावयाची असते. महिनाभर पालन व नंतर 11 महिने मनमानी असा एकूण समाजाचा रागरंग दिसतो, पण तसे न करता वर्षभर याच भावनेने प्रत्येकाने वागले पाहिजे.
या जगाच्या विनाशानंतर हजरत आदम अलैसलाम पासून जेवढे लोक या जगात होऊन गेले सर्वांना एकाच मैदानात अल्लाहसमोर हजर केले जाईल. त्या दिवशी सर्वांना आपली काळजी पडलेली असेल. तेथे हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई हा जातीभेद नसेल. सर्व पैगंबर जे आजपर्यंत होऊन गेले ते व त्यांचे काळातील सर्व अनुयायी तेथे हजर असतील. प्रत्येकाच्या हातात त्याच्या कर्माचा निकाल दिला जाईल. पुण्यवान लोकांना उजव्या हातात व पापींना डाव्या हातात निकाल मिळेल, त्याचवेळी त्याचा निकाल लागलेला असेल. लोक म्हणतील अल्लाह, हे मी केलेले नाही. तेव्हा आपल्या शरीराच्या, हातापायांच्या बोटांना बोलते केले जाईल. ते आपल्या केलेल्या कर्मांची साक्ष देतील. अल्लाहच्या परवानगीशिवाय तेथे कोणीही तोंड उघडू शकणार नाही. या जगात होऊन गेलेले मोठमोठे राजे, रजवाडे, सुलतान, बादशहा, राष्ट्रपती, पंतप्रधानांसारख्या सर्वच व्यक्ती तेथे समान असतील. ज्याने जेवढे मोठे पद भूषविले असेल तेवढा अधिक हिशोब त्याला द्यावा लागेल.
दैनंदिन जीवनात सार्वजनिक काम करताना अनेक पदांवर माणसे आरुढ होतात. त्या पदाचा उपयोग संबंधित क्षेत्राशीच झाला पाहिजे. पदे ही सेवेसाठी आहेत. आपण त्यांना मानाची करून टाकली आहेत. हजरत उमर मुस्लिमांचे खलिफा (बादशहा) होते. रात्री वेशांतर करून लोकांची हालचाल माहीत करीत. जे गरजू असतील त्यांच्या गरजा जाणून घेऊन त्यांना मदत करीत. सरकारी खजिन्याचा स्वतःसाठी कधीही दुरुपयोग केला नाही. स्वतःच्या मुलाने एका मुलीची छेड काढल्यानंतर त्याला एवढी जबर शिक्षा दिली की तो जागीच गतप्राण झाला. त्यांचा न्याय (इन्साफ) असा होता. आज अशी उदाहरणे ऐकावयास व पहावयासही मिळत नाही. सत्ता, संपत्ती, अधिकारांचा सर्रास गैरवापर होताना दिसतो. परंतु तुम्हाला जी काही पदे मिळाली आहेत. त्या पदावर आरूढ असताना केलेल्या प्रत्येक कर्माचा (चांगल्या वा वाईट) हिशोब द्यावा लागेल, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.

शब-ए-कद्रचा पुरेपूर फायदा घ्या
रमजान महिन्याची येणारी रात्र ही शब-ए-कद्र किंवा लैलतुल कद्र म्हणून सर्वत्र साजरी केली जाणार आहे. हजार (लैल) रात्रीपेक्षा श्रेष्ठ अशी ही रात्र आहे. ही रात्र अल्लाहच्या प्रार्थनेत, नामस्मरणात जागून स्वतःसाठी व आपल्या पूर्वजांसाठी व समस्त मानव जातीसाठी प्रार्थना केली जाते. त्या रात्री विविध मशिदींमधून गेले महिनाभर सुरू असलेले तरावीह नमाजमधील कु रआन शरीफचे पठण पूर्ण केले जाणार आहे. तेव्हा आजची रात्र प्रत्येकाने काळजीपूर्वक भक्तीभावाने साजरी करावी. याशिवाय अजून एक 29 वी रात्रही शिल्लक आहे. तिचेही अशाच प्रकारे पालन करण्याची आवश्यकता आहे.
रमजान महिना आता अंतिम टप्प्यात आहे. बहुतांश लोकांना आपल्या कारभाराप्रमाणे जकात वगैरे आदा केली आहे. काही जण राहून गेले असतील तर त्यांनी त्वरित जकात अदा करावी. जकात देताना गरजू घटकांनाच द्यावी. योग्य प्रकारे शहानिशा करून भावनेपोटी कोणालाही ती दिली गेल्यास अदा होणार नाही, याची जाण ठेवून जकातीसाठी जे जे घटक हक्कदार आहेत. त्यांना शोधून द्यावी.इस्लाम धर्मांमध्ये जीवनासाठी आवश्क अशा सर्व तत्त्वांचे शिक्षण सखोलपणे दिले आहे. जीवन जगताना येणारे विविध प्रसंग व त्यावेळी उद्भवणारी परिस्थिती यांचे बारकाईने विश्‍लेषण हदीस शरीफ व कुरआन शरीफमध्ये केले गेले आहे. त्यानुसारच आपले वर्तन असणे गरजेचे आहे.
सभोवताली असणार्‍या घटकांचा वा वातावरणाचा आपल्या जीवनावर व जीवनशैलीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. उदाहरणार्थ इस्लाममध्ये लाच (रिश्‍वत) देणे किंवा घेणे हराम आहे. लाच देण्याच्या विविध पद्धती आपल्याकडे रुढ आहेत. भेटवस्तू स्वरुपात ही लाच देणे हराम आहे. शासनाच्या एखाद्या विभागात काम करणारे जर लाच घेत असतील तर लाच घेणे हराम आहे, पण त्यांचा पगारही हलाल नाही, हे ध्यानात घ्यावे. लाच बरोबरच व्याज (सूद) देणे-घेणेही इस्लाममध्ये हराम (निषीद्ध) आहे. व्याज कोणत्याही स्वरुपाचे असो, त्याला नफ्याचे गोंडस नाव देणे गैर आहे. असा कोणताही व्यवसाय ज्यात हरामाचा अंश सामिल आहे, करणे गुन्हा आहे.
त्यापासून दूर राहणे चांगले. प्रत्येक धर्मात हराम कमाई निषिद्ध मानली गेली आहे. कधी कधी अनिच्छेने किंवा मजबुरीने माणूस अशा व्यवसायात अडकतो, पण अशा प्रकारच्या हरामकमाई देणार्‍या व्यवसायापासून दूर राहण्याचा किंवा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न नेहमी केला पाहिजे. यासाठी अल्लाहकडे दुआ मागितली पाहिजे. सार्‍या जगाचा पालनहार आपली दुआ स्वीकार क रून हराम कमाईच्या बंधनातून आपली मुक्तता करील, अशी आशा आहे.