Breaking News

ट्रक-टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघातात 10 जणांचा मृत्यू

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडच्या सोग्रास फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात झालेल्या या अपघातात 10 जण जागीच ठार झाले असून इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत. कल्याण येथून उजैनला दर्शनासाठी हे भाविक गेले होते. मात्र दर्शनानंतर कल्याणच्या दिशेने परतत असताना या भाविकांवर काळाने घाला घातला. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ सोग्रास फाट्याजवळ आज पहाटे हा अपघात घडला.

रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ट्रकला मागून येणार्‍या टेम्पो ट्रॅव्हलरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने तो रस्त्याच्या बाजूला उभा होता. त्यानंतर मागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला जोरदार धडक बसली. ज्यात टेम्पो ट्रॅव्हलरमधील 10 प्रवासी भाविक जागीच ठार झाले. तर इतर जवळपास 10 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जाते. या अपघातातील सर्व जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यातील 4 ते 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये कल्याण येथील काही प्रवाशांचा समावेश आहे. वेगवेगळ्या कुटूंबातील जवळपास 20 ते 22 प्रवासी कल्याण येथून टेम्पो ट ्रॅव्हलरने उजैन येथे देवदर्शनासाठी गेले होते. तिथून कल्याणच्या दिशेने परतत असताना ट्रेम्पो ट्रॅव्हलरला अपघात झाल्याने 10 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी चांदवड पोलीस अधिक तपास करत आहेत.