Breaking News

राष्ट्रीय किसान महासंघाचा 1 जूनपासून देशव्यापी शेतकरी संप


देशभरातील शेतकर्‍यांना नवी दिशा व शेतीप्रधान देशात अनाथ झालेल्या शेतकर्‍यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय किसान महासंघाने दि. 1 ते 10 जून या काळात देशव्यापी संप पुकारला आहे. संसदेतील सदस्यांपैकी 86 टक्के सदस्य शेतीपुत्र आहेत.

शेती हा व्यवसाय देशाची भूक भागवून परकीय चलन मिळवून देतो. मात्र शेती व शेतकरी शेतीमालाचे भाव ठरवू शकत नाही. कष्ट करणे एवढेच त्याच्या हातात आहे. माप मात्र दुसर्‍यांच्या हाती आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास शेती व शेतकर्‍यांचे अस्तित्वच संपून जाईल. शेती विरोधी धोरणांमुळे शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. शेतीमाल मातीमोल भावाने विकला जात असल्याने कर्जबाजारीपणामुळे व लहरी हवामानामुळे शेतकरी धुळीस मिळाला आहे.

दुध व्यवसायाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. शेतातील उत्पादीत केलेल्या कोणत्याही मालाला बाजार भाव न मिळाल्याने बळीराजा आता पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. न परवडणारी शेती व शेती पुरक दुध व्यवसाय तो नाईलाजास्तव करत असून, आजचे मरण उद्यावर ढकलत आहे. शेती व शेतीपुरक व्यवसायांचा सात-बारा कोरा करावा, शेतीसाठी मोफत वीज द्यावी, संरक्षित शेती उत्पन्न कायदा (ईमा)ची अंमलबजावणी करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा आदी प्रमुख मागण्या आहेत. 120 पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.

कोणताही राजकीय पक्ष यात सहभागी होणार नाही. महाराष्ट्रात या संपाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. बुधाजीराव मुळीक हे असून अ‍ॅड. कमलताई सावंत यांच्याकडे महाराष्ट्रातील आंदोलनाची मुख्य जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नारायणगव्हाण येथिल सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पुण्यातील बैठकीत या आंदोलनास जाहीर पाठींबा दिला आहे.

जगाच्या पोशिंद्याला त्याच्या घामाचं दाम मिळवून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी पुत्रांचं मोठं संघटन उभं करुन व्यापक स्वरूपाच व शांततेच्या मार्गाने हे आंदोलन यशस्वी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.