Breaking News

अर्बन बँकेतील गांधीगिरीचे गौडबंगालः भाग 2 घोटाळे पचविण्यासाठी अर्बन बँकेला मल्टीस्टेटचे चिलखत

अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी
स्व. राव बहादूर चितळे यांनी साधारण 107 वर्षापुर्वी स्थापन केलेली नगर अर्बन को-ऑप बँक सध्या नगर अर्बन मल्टीस्टेट को- आप बँक म्हणून नगरकरांना परिचीत आहे. राज्य सहकारी बँक ते मल्टीस्टेट बँक हा या अर्बन बँकेचा प्रवास रंजक असून या प्रवासामागचा कारभार्‍यांचा हेतू, या प्रवासादरम्यान झालेल्या घोटाळ्यांबाबत सभासद, काही संचालक आणि सहकार क्षेत्रातील जाणकार संशय व्यक्त करीत आहेत. केवळ संशय व्यक्त करून ही मंडळी थांबली नाही तर या घोटाळ्यांचे खोदकाम करून अलिकडच्या आठ दहा वर्षात झालेले घोटाळे पचविण्यासाठी बँकेला मल्टीस्टेटचे चिलखत घालण्याचा पाताळयंत्री प्रयत्न केला गेल्याचे पुरावेही त्यांनी हस्तगत केले आहेत. दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे खा. दिलीप गांधी यांची कुट कल्पकता या पाताळयंत्री प्रयत्नांमागे असल्याचा निष्कर्ष आजवर पुढे आलेल्या पुराव्यातून निघत असल्याची चर्चा वस्तुस्थिती स्पष्ट करू लागली आहे.---- लीड
सन 2010 मध्ये स्व. राव बहादूर चितळे आणि सहकार्‍यांनी नगर अर्बन को-ऑप. बँकेची स्थापना करून नगरकरांसमोर सावकारी पाशातून मुक्त होण्याचा सक्षम पर्याय ठेवला होता. बँकेच्या प्रशासक ीय खर्चात काटकसर करून सभासदांना जास्तीत जास्त मदत देण्यावर तत्कालीन संचालक मंडळांनी भर दिला. अगदी काळापर्यंत म्हणजे सन 2008 पर्यंत बँकेचा कारभार पाहणार्‍या संचालक मंडळांनी बँक स्थापनेच्या मुळ हेतूशी बांधिलकी ठेवून कारभार केला.
सन 2008 मध्ये सभासदांनी काही बोलघेवड्या मंडळींच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून नव्या नेतृत्वावर बँकेची धुरा सोपविली. गोरा गोमटा चेहरा, उमदे नेतृत्व सभासद हिताशी प्रतारणा करणार नाही, हा समज काही दिवसात दुर होऊ लागला.
खासदारकी पदरात पडली असल्याने बँकेच्या आवारातूनच सारे व्यवहार सुरू झाले. खासदारकीचे संपर्क कार्यालय, पक्ष कार्यालय म्हणून सभासदांच्या मालकीची असलेल्या बँकेचा परिसर वापराला जाऊ लागला.व्यापक जनहिताला राजकीय बांधिलकीच्या मर्यादा नसाव्यात, हे मान्य करून अनेकांनी खासदारांच्या या भुमिकेकडे दुर्लक्ष केले. तथापी बँकेच्या नथीतून तीर मारीत गांधी आप्तस्वकीय राजक ीय परिवाराचे उखळ पांढरे करण्यासाठी बँकेची ढाल वापरली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर काही जागरूक सभासद सतर्क झाले. आणि माहीती घेण्याचा प्रयत्न करतांना सभासदांच्या सार्वजनिक हिताचे पिंड पाडून घोटाळ्याचे तीळ वाहण्याचा सोयीस्कर कार्यक्रम या मंडळींनी राबविण्यास सुरूवात केल्याचे निष्पन्न होऊ लागले.
या सोयीस्कर कार्यक्रमानुसार बँकेच्या काटकसरी धोरणाला कात्री लावून संचालक मंडळाचा भत्ता 630 टक्क्यांनी वाढवून घेतला. इतकेच नाही तर वाहन खर्चही 600 टक्क्यांवर नेला. हा निर्णय स्व. राव बहादूर चितळे यांनी ज्या हेतूने बँक उभी केली त्या सभासद हिताशी प्रतारणा करणारा होता.
याच काळात संचालक मंडळातील खुशमस्करी संचालकांच्या पंचतारांकीत विदेशवारीवर सभासदांची मालमत्ता असलेल्या बँकेच्या निधीची उधळपट्टी केली. या उधळपट्टीने समाधान झाले नाही म्हणून की काय चेअरमन आणि व्हा. चेअरमनच्या केबीनवर तब्बल एक कोटीची उधळण करून प्रतारणेची राहीलेली उणिव भरून काढली.
हा अवास्तव खर्च कसा भरून काढायचा या विवंचनेवरही या कुट कल्पकतेने अविवेकी मार्ग काढला. राष्ट्रीयकृत आणि अन्य सहकारी बँका साधारण दहा-बारा टक्के व्याज दराने कर्ज देण्याची तयारी दाखवून स्पर्धेत राहण्याची धडपड करीत असतांना या स्वयंघोषीत अर्थशास्त्रींनी कर्ज व्याजाचा दर पंधरा टक्क्यावर नेला. परिणामी सन 2014 नंतर 13000 हून अधिक कर्जदारांनी बँकेशी व्यावहारीक नाते तोडले.
यासारखे अनेक किस्से आणि घोटाळे या काळात झाले आहेत. या अनियमित, गैरकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी नगर अर्बन बँकेला मल्टीस्टेटचे चिलखत घातले. त्यासंदर्भात सविस्तर तपशील उद्याच्या अंकात. (क्रमशः)