Breaking News

वीज पडून 2 महिला जागीच ठार

उस्मानाबाद : वाणेवाडी शिवारात वीज पडून 2 महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही महिला वाणेवाडी येथील रहिवासी असून शेतात काम करत असताना आज दुपारी त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्या जागीच ठार झाल्या. 

शीतल घुटकडे आणि शालिनी पवार अशी मृत महिलांची नावे आहेत. आठ दिवसानंतर आज जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वाणेवाडी परिसरातही वादळी वार्‍यासह पाऊस पडू लागला. यावेळी वाणेवाडी येथील शेतात काम करत असलेल्या या 5 महिलांच्या अंगावर वीज कोसळली. यात 2 शेतमजूर महिला जागीच ठार झाल्या तर सोबतच्या अन्य 3 महिला जखमी झाल्या आहेत. जखमी झालेल्या महिलांमध्ये वाणेवाडी येथील श्यामल लहु सरवदे, कौशल्या शेषेराव सरवदे व छाया भास्कर सरवदे या जखमी झाल्या. या 5 महिला वाणेवाडी शिवारातील गंगाधर उंबरे यांच्या शेतीत मशागतीचे काम करत होत्या. दरम्यान, दुपारी वार्‍यासह आभाळ भरून आले 1 वाजण्याच्या सुमारास महिला काम करत असलेल्या ठिकाणी अचानक वीज कोसळली. जखमी झालेल्या महिलांना तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या शालुबाई यांच्या पश्‍चात 1 मुलगा व 2 विवाहित मुली आहेत, तर शीतल घुटुकडे यांच्या पश्‍चात पती व 2 मुले असा परिवार आहे.