नमामि चंद्रभागा आराखड्यातील कामांची स्थितीसाठी विभागीय आयुक्तांची 26 जून रोजी बैठक
सोलापूर - नमामि चंद्रभागा स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा करून दोन वर्षे झाली. मागील वर्षीही आषाढी एकादशीच्या काही दिवस अगोदर शासनाने परिपत्रक काढून आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती करत नमामि चंद्रभागा उपक्रमांतर्गत आराखड्यातील कामांची स्थिती जाणून घेण्यासाठी विभागीय आयुक्तांनी 26 जून रोजी बैठक बोलावली आहे. शासनाने नमामि चंद्रभागा उपक्रमांतर्गत 16 कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नमामि चंद्रभागा उपक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी विभागनिहाय आढावा घेऊन आराखड्याबाबत केलेल्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये चंद्रभागा नदीचे प्रदूषण, नदीकाठी दोन्ही बाजूला व ृक्षारोपण आदीवर चर्चा करण्यात आली. चंद्रभागा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पंढरपूर शहर व नदीकाठावरील 10 हजार लोकवस्तीच्या गावांतील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यावर काम करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने पंढरपूर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा तिसर्या टप्प्यातील कामास सुरुवात करण्यात आली आहे. शिवाय नदीकाठावरील 10 हजार लोकवस्ती असलेल्या गावांतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आराखडे तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
