Breaking News

लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन

सातारा : प्रसिद्ध लावणी गायिका यमुनाबाई वाईकर यांचे आज सकाळी वाई येथे 11 वाजता निधन झाले आहे. यमुनाबाई वाईकर 102 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, त्यांना आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यमुना-हिरा-तारा वाईकर संगीत पार्टी अशा नावाने यमुनाबाईंनी आपल्या लावणीच्या जोरावर आख्खा महाराष्ट्र गाजवला. महाराष्ट्रात गाजलेल्या अनेक फक्कड लावण्या त्यांनी तयार केल्या. ठुमरी, तराणा, गझल आदी संगीतप्रकार त्या सहजतेने गात असत. त्यांची दखल घेवून महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी परिषद पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, लावणी सम्राज्ञी पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, संगीत क्षेत्रात अतिशय मानाचा  समजला जाणारा संगीत नाटक अकादमी ऍवार्ड व देशातील अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱया पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे.