आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरसेविकेवर गुन्हा दाखल
पुणे, दि. 30, मे - टपरीधारकाला आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपच्या नगरसेविका सुजाता पालांडे आणि आत्महत्या केलेल्या टपरीधारकाच्या पत्नीच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरूनगर येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणारे टपरीधारक सचिन सुरेश ढवळे (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये भाजप नगरसेविका सुजाता सुनील पालांडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. याबाबत सचिन याचा भाऊ शरद सुरेश ढवळे (वय 38) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पालांडे यांच्यासह मृत सचिन ढवळे यांची पत्नी शशिकला सचिन ढवळे (वय 40, रा. संत तुक ारामनगर, पिंपरी) यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुजाता पालांडे या प्रभाग क्रमांक 20 संत तुकारामनगरच्या भाजपच्या नगरसेविका आहेत. सचिन याचे संत तुकारामनगर मधील गोल भाजी मंडईजवळ फॅब्रिकेशनचे टपरीवजा दुकान आहे. सचिन याने नगरसेविका सुजाता सुनील पालांडे, शशिकला ढवळे यांच्या त्रासाला कंटाळून त्याने राहत्या घरात घरी छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन याला आत्महत्या करण्यास नगरसेविका पांलाडे यांनी प्रवृत्त केले असल्याचे, फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.