Breaking News

शहर परिसरात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच बंगल्यातून १ लाख लंपास


राहुरी तालुका प्रतिनिधी - शहर आणि तालुक्यात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरु असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. येथील साईगणेश या बंगल्यात आठ दिवसांपूर्वी भाडोत्री म्हणून रहावयास आलेले बाबासाहेब देठे आणि त्यांची झोपेत असताना चोरट्यांनी मागील बाजूचा दरवाजा कटावणी सदृश्य हत्याराने तोडून आत प्रवेश केला. आतील सामान व कपाटाची उचकापाचक करुन कपाटातील चार तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम १ लाख रुपये चोरुन नेले. 

साईनगर येथील बाळासाहेब गोवर्धन तनपुरे यांच्या वर्षा या बंगल्याचा मुख्य दरवाजा व मागील बाजूचा किचनचा दरवाजा चोरट्यांनी तोडण्याचा प्रयत्न केला असता बंगल्याचे मालक तनपुरे यांना जाग आली. चोरट्यांना याची चाहुल लागताच चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने चोरटे पसार झाले. गेल्या आठ दिवसांत तालुक्याच्या चिंचोली व गोटुंबे आखाडा येथे घरफोडी झाल्यानंतर चोरट्यांनी शहराला लक्ष केले. दोन दिवसांपूर्वी तनपुरेवाडी रस्त्यावर बापूसाहेब तनपुरेंचा बंगला फोडला होता. ही घटना ताजी असतानाच आज {दि. २५ } पहाटे दोन-तीनच्या दरम्यान नगर मनमाड राज्यामार्गाच्या बाजूला असलेल्या साईनगर व शाहूनगरात चोरट्यांनी धूमाकूळ घातला. साईनगरमधील वर्षा बंगल्यावर चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. शाहूनगरात मात्र साईगणेश बंगल्याचा दरवाजा तोडत लाखोंचा ऐवज लांबविला असल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने साईनगरमधे धाव घेतली. परंतू चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले होते. 

दरम्यान, शाहूनगरची चोरीची घटना सकाळी उघडकीस आल्याने पोलिसांनी येथे धाव घेत संपूर्ण परिसर पिंजून काढला. साईनगरचा चोरीचा प्रयत्न अयस्वी झाल्याने बाजूला असलेल्या शेतातून पळ काढत लगतच साधारण हजार फुटावर असलेल्या शाहूनगर भागात चोरट्यांनी मोर्चा वळविला. श्रीरामपूर विभागीय पोलिस उपाधिक्षक सोमनाथ वाकचौरे, राहुरीचे पो. नि. प्रमोद वाघ, स. पो. नि. दिलीप राठोड, उपनिरिक्षक लक्ष्मण भोसले आदींनी घटनास्थळी धाव घेत श्वानामार्फत तपासणी केली. 

परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत 

राहुरी शहर व परिसरात नागरी वसाहती वाढत आहेत. यासाठी जागामालक व वसाहतीत असलेल्या बंगलेधारक, सदनिकाधारक यांनी आपआपल्या परिसरातील आजूबाजूला सीसीटीव्ही कँमेरे बसवावेत. लाखोंचे बंगले व घरे बनवताना सुरक्षितता म्हणून हजारोंचा खर्च करत सीसीटीव्ही देखील लावले गेले पाहिजेत. जेणेकरुन चोरीच्या व अवैध घटनांना यातून आळा बसू शकेल. घरमालकांनी आपले बंगले व सदनिका भाडोत्री देताना संबंधित व्यक्तींची संपूर्ण माहिती घेऊन पोलिस प्रशासनाकडे याबाबत कळवावी. शहरात नव्याने रहावयास आलेले व बाहेरगावाहून येथे आलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती पोलिसांना कळवावी.

पो. नि. प्रमोद वाघ, राहुरी पोलिस ठाणे.