Breaking News

माजी आ. चंद्रशेखर कदम आणि नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल


राहुरी तालुका प्रतिनिधी - देवळाली प्रवरा येथील रहिवाशी असलेले राहुरी तालुक्याचे माजी आमदार, शिर्डी संस्थान उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम आणि देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात नुकताच अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. मात्र याचे पडसाद देवळाली प्रवरा येथे आज {दि. २५ } उमटले. या प्रकाराच्या निषेधार्थ स्थानिक नागरिकांनी उद्या शनिवारी आठवडेबाजारसह शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

देवळालीप्रवरा शहर परिसरात पावसाळ्यापूर्वी लोकसहभागामधून ओढ्या-नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम एक महिन्यापासून हाती घेण्यात आले आहे. त्या कामावर नगराध्यक्ष सत्यजित कदम नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. सदरील कामामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणे आहेत. त्यामुळे नागरिकांशी चर्चा करुन समेट घडून आणणेसाठी त्याठिकाणी नगराध्यक्ष तसेच माजी आ. कदम हे नागरिकांच्या विनंतीनुसार उपस्थित राहत असतात. परंतु ही बाब चुकीच्या अर्थाने पसरवून फक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम व माजी आ. चंद्रशेखर कदम यांचेवर लक्ष केंद्रीत करुन त्यांच्या विरोधात येथील खेळाडूने आई चांगुणाबाई ढुस यांना पुढे करून खोटा अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामुळे देवळालीप्रवरा शहरातील नागरिकांचा रोष अनावर झाला. आज सकाळी शेकडो नागरिक चंद्रशेखर कदम यांच्या कार्यालयासमोर जमा झाले. त्यांनी आ. कदम नागरध्यक्ष कदम यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, गावातील अवैध दारूविक्री, अवैध सावकारकी, मटका, जुगार, आदी धंदे तातडीने बंद करावेत, यासाठी उद्या {दि. २६} देवळालीप्रवरा शहर आणि आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक नागरिकांनी घेतला.