Breaking News

अग्रलेख - विरोधक एकवटले !

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला देशभरातील भाजपेतर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी उपस्थिती दर्शवित एकप्रकारे 2019 च्या लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याचेच चित्र दिसून येत आहे. कर्नाटकमधील नाटयमय घडामोडीनंतर कोण सत्ता स्थापन करेल यावर बराच पेच निर्माण झाला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे येदियुरप्पा यांना लवकर बहुमत सिध्द करण्याअगोदरच त्यांनी आपला राजीनामा देणे पसंद केले. त्यानंतर काँगे्रसचा पाठिंबा घेत कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या शपथविधी सोहळयाला, उत्तरदेसह दक्षिणेतील दिग्गज नेते उपस्थित हेाते. त्यामुळे या शपथविधी सोहळयाला विशेष महत्व प्राप्त होते. दिग्गज नेते उपस्थित असल्यामुळे पुढील रणनितीविषयी या नेत्यांमध्ये चर्चा नक्कीच झाली असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयाचा सुसाट सुटलेल्या वारूला कर्नाटकमध्ये ब्रेक लावल्यानंतर आता केंद्रात कसा बे्रक लावायचा याची रणनितीला यानिमित्ताने सुरूवात झाली असेच म्हणावे लागेल. बहूजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वो मायावती आणि काँगे्रसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची विशेष सलगी या कार्यक्रमातील प्रमुख आकर्षण राहिले. काँगे्रस प्रादेशिक मोट बांधण्यासाठी सज्ज झाल्याचेच यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. असे असले, तरी कर्नाटकात काँगे्रस अथवा जेडीएस फुटीचा धोका अटळ आहे. कारण पुढील काही महिन्यात भाजप पुन्हा सत्ता समीकरणांचे धोरण राबवू शकते, यासाठी भाजपला केवळ आठ आमदारांची गरज आहे. अशावेळी काँगे्रस आणि जेडीएसला आपला पक्ष सांभाळणे गरजेचे आहे. त्यातच कर्नाटकात काँगे्रसच्या वतीने निर्णायक भूमिका बजाविणारे काँगे्रस नेते डी. शिवकुमार पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. कुमारस्वामींच्या बहुमत चाचणीपूर्वीच ‘संकटमोचका’ची नाराजी बंडात परावर्तित होऊ नये यासाठी पक्षाने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे.कर्नाटकातील राजकीय उलथापालथीत शिवकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना हैदराबादला आणून सुरक्षित ठेवण्यापासून पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी पक्षासाठी अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. अशावेळेस काँगे्रस आणि जेडीएसमधील नाराज आमदारांना भाजपात आणण्यासाठी येदियुरप्पा प्रयत्नशील असतील. त्यातच लोकसभा निवडणूकांना सामोरे जाण्यासाठी केवळ एक वर्षांचा कालावधी उरला आहे. अशावेळी देशातील सर्वंच पक्षासमोर मोदी यांचे कडवे आव्हान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराविषयी जनतेच्या मनात तीव्र संताप आहे, मात्र हा संताप मतपत्रिकेद्ारे का उमटत नाही? हा महत्वाचा मुद्दा आहे. भाजपेतर पक्षांच्या सभांना होणारी गर्दी, आणि विकासकामांच्या होणारी ओरड, अच्छे दिन कुठे आहे? असा सवाल विचारणारी जनता, हे सर्व मुद्दे काँगे्रस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या पथ्यावर पडणारेच आहे. मात्र भाजपविरोधात राण उठविणारा नेता आजतरी कोणत्याही पक्षांकडे नाही. कारण मोदी यांची वक्तृत्वशैली, स्थानिक लोकांसोबत संवाद साधण्याची त्यांची होतोटी जबरदस्त आहे. शिवाय अमित शाह यांची व्यूहरचना मोदी यांच्या नेहमीच कामी आली आहे. त्यामुळे भाजपला शह द्यायचा असेल, तर व्यवस्थित रित्या व्यूहरचना आखावी लागणार आहे.