Breaking News

बेकयदेशीररित्या फीवाढ प्रकरणी केम्ब्रिज इंग्लिश स्कुलच्या संचालकावर गुन्हा


नाशिक, दि. 30, मे - बेकायदेशीररीत्या फीवाढ, शैक्षणिक अनियमितता तसेच इतर कारणांवरून वडाळा-पाथर्डी रोडवरील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलच्या संचालकांवर शिक्षण उपसंचालकांच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या वतीने शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी तशी तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. 

केम्ब्रिज शाळेचे संचालक भारती रामचंद्रन, राहुल रामचंद्रन आणि मुख्याध्यापिका विजया पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. वडाळा-पाथर्डी रोडवर असलेल्या केम्ब्रिज शाळेबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून पालकांच्या तक्रारी होत्या. याबाबत पालकांनी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यामध्ये केम्ब्रिज शाळेक डून केली जाणारी बेकायदा फीवाढ, तसेच बेकायदेशीररीत्या पुस्तके व वह्यांची विक्री याबाबत प्रत्यक्ष तक्रारी केल्या होत्या.

त्यानुसार शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाला चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांना दिले होते. तसे पत्रही त्यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकार्यांना दिले होते. केम्ब्रिज शाळेला अनेकदा त्यांच्या कारभाराबाबत शिक्षण विभागाने नोटिसा काढून कामकाजात व विविध बाबतीत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते; मात्र शाळेचे संशयित संचालक भारती रामचंद्रन व राहुल रामचंद्रन आणि मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी बेकायदेशीररीत्या कोणत्याही कारणांखाली दरवर्षी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वाढीव फी घेतली.

महानगरपालिकेच्या वतीने शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी दिलेल्या फिर्यादीत शाळेच्या वरील संशयित संचालक व मुख्याध्यापिकांनी पालक-शिक्षक संघाची स्थापना न करता दरवर्षी फीवाढ केली. कायद्याच्या तरतुदीनुसार फीच्या व्यतिरिक्त कॉम्प्युटर, तसेच अ‍ॅक्टिव्हिटी फीच्या नावाने पालकांकडून बेकायदेशीररीत्या फी वसूल केली. शाळेच्या आवारातच बेकायदेशीररीत्या शैक्षणिक सा हित्य, पुस्तके व वह्यांची विक्री केली. दरम्यान, शाळेत पालक-शिक्षक संघ व कार्यकारी निवड बेकायदेशीररीत्या केली. या प्रकरणी केम्ब्रिज शाळेच्या संचालकांवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2011 चे कलम 16 व 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गावित करीत आहेत.