Breaking News

गावठी पिस्तूल आण जिवंत काडतुसांसह एकास अटक


संगमनेर : शहरात काल {दि. २५ } मध्यरात्री अडीचच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील जय जवान चौकात पोलिसांनी संशयितरित्या वावरणाऱ्या एकाकडून एक गावठी बनावटीची मॅगजीन असलेली पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसांसह एक दुचाकी जप्त केली. दत्ता सुधाकर चव्हाण (वय २४ रा. इंदिरा नगर, संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 
अहमदनगर जिल्ह्यात केडगाव हत्याप्रकरण त्याचबरोबर जामखेड दुहेरी हत्याकांड या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संपूर्ण जिल्ह्यात ‘मिशन ऑल आऊट’ हे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून गंभीर गुन्ह्यांचा छडा लागत असताना त्याचबरोबर जिल्ह्याभरातून अवैध हत्यारे (गावठी कट्टे/पिस्तूल/तलवारी/चॉपर) बाळगणाऱ्यांवर कारवाई होत आहे. संगमनेर शहरात मात्र यासंदर्भातील गुन्ह्यांचा संदर्भ असलेली पार्श्वभूमी असतानादेखील एकही कारवाई आजपर्यंत झालेली नव्हती. आज {दि. २५} मध्यरात्री शहर पोलीस गस्तीला असताना एक संशयित आरोपी चोरीची मोटारसायकल घेऊन जय जवान चौक भागात येत असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पो. नि. सुनिल पाटील यांना मिळाली. 

सदर माहितीच्या आधारावरून सहा. पोनि. गावंडे, पो. कॉ. इस्माईल शेख आदींनी सापळा रचून रात्री अडीचच्या सुमारास मार्केटयार्ड कडून येणाऱ्या दुचाकीस्वारास अडविले. त्याची चौकशी करून झडती घेतली असता मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर सदर दुचाकीच्या सीटखाली एक गावठी बनावटीची मॅगजीन असलेली पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे अवैधरित्या बाळगली असल्याने ती जप्त करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि सी. आर. गावंडे करीत आहे.