Breaking News

आत्महत्येचे पुरावे दडवून शासन तो एक अपघात आहे, असे भासविण्याचा खटाटोप करण्यातच मश्गुल


कर्जमाफीसह बोंडअळीची मदत न मिळाल्याने सरण रचून माधव रावते या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे पुरावे दडवून शासन तो एक अपघात आहे, असे भासविण्याचा खटाटोप करण्यातच मश्गुल असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ते जिल्ह्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सांत्वनपर भेटीला आले होते. तद्नंतर यवतमाळात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा हल्लाबोल चढविला.
खून करून पुरावे दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरुंदकर, युवराज कामटे आणि आत्महत्येचे पुरावे दडपणाऱ्या या सरकारमध्ये काहीही फरक नाही. मुखर्जी, कुरुंदकर, कामटे आणि हे सरकार एकाच माळेचे मणी आहेत, असा प्रहारही त्यांनी केला.

जिल्ह्यातील सावळेश्वरचे शेतकरी माधव रावते, राजूरवाडीचे शंकर चायरे आणि टिटवीचे प्रकाश मानगावकर यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. ते म्हणाले, या सरकारने सावळेश्वर येथील शेतकरी माधवराव रावते यांची आत्महत्या दडपण्यासाठी परिसीमा गाठली आहे. कर्जमाफी व बोंडअळीची मदत न मिळाल्याने झालेल्या शेतकरी आत्महत्या एकप्रकारे सरकारने केलेल्या हत्याच आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात असे असंवेदनशील आणि कोडगे सरकार कधीही झाले नव्हते. त्यामुळे या शासनावर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली