Breaking News

पाणी योजनेसाठी 10 लाखांचा निधी मंजूर - सरपंच वैशाली करंजुले

जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या समाजकल्याण विभागाने पाडळी रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी 10 लाखांचा निधी मंजूर केला आहे, यामुळे गावचा पाणीप्रश्‍न कायमचा मिटणार असल्याचे सरपंच वैशाली करंजुले यांनी सांगितले. हा निधी पाडळी रांजणगांवचे युवा नेते उपसरपंच विक्रमसिंह कळमकर यांच्या अथक प्रयत्नातून व जिल्हा परिषद अध्यक्षा ना. शालिनीताई विखे, सभापती राहुल झावरे, उपसभापती दीपक पवार यांचे सहकार्याने मंजूर झाला आहे.

यावेळी उपसरपंच कळमकर म्हणाले की, ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचा संपूर्ण कायापालट झाला आहे, गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. मागील अडीच वर्षात गावात गटर लाइन, एलईडी लाइट, अंतर्गत रस्ते, दलित वस्त्यांचा विकास, पेव्हींग ब्लॉक, सार्वजनिक स्वच्छतागृह, अपंग, मागासवर्गीय कल्याण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, वाडी वस्तीवर हायमॅक्स दिवे यांसह वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना गावात सक्षमपणे राबवल्याने गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. गावाची वेगळी ओळख तालुक्यात निर्माण झाली आहे.
गावात पाणी असूनही केवळ सक्षम योजनेअभावी गावातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. यामुळे पाणी योजना व्हावी अशी ग्रामपंचायतची आग्रही मागणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन पूर्ण झाली आहे.