Breaking News

तहसीलदारांसह पथकाची वाळू तस्करीकडे डोळेझाक वाळू तस्करांचे अधिकार्‍यांस हप्ते; नागरिकांमधून जोरदार चर्चा

तालुक्यातील पिंपरखेड गावाजवळ असलेल्या विंचरणा नदीतून पंधरा दिवसांपासून अवैध वाळू उपसा केला जात आहे. याबाबत ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी तहसीलदार व त्यांच्या पथकाला माहिती दिली, मात्र याकडे तहसीलदार तसेच वाळू तस्करी पथक डोळेझाक करत असल्याचे दिसून आले. यामुळे येथील ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासच संपर्क साधला. जिल्हाधिकारी कार्यालयास फोन जाताच महसूल पथकाने पिंपरखेड येथे जाऊन एक वाळूचा ट्रॅक्टर पकडला, तर एक ट्रॅक्टर पळून गेला. महसूल विभागाचे अधिकारी यांना वाळू तस्करी यांचे हप्ते सुरू असल्याची जोरदार चर्चा पिंपरखेड गावात नागरिकांमध्ये सुरू आहे. जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे. महसूल विभाग चिरीमिरी घेऊन याकडे कानाडोळा करत आहे. वाळूतस्करी करणारांस काही महसूल अधिकार्‍यांचे आशिर्वाद असुन ते त्यांच्याबरोबर सहभागी असतात. त्या अधिकार्‍यांस वाळूतस्करांचे हप्ते सुरू आहेत. महसूल विभाग एखादी देखावा म्हणून कारवाई करतात, काहीसा दंड वसूल करून लगेच वाहने सोडून देतात. अधिकार्‍यांस वाळू तस्करांबद्दल माहिती असते मात्र, ते याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात. तालुक्यामधील लहान-मोठ्या नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. यामुळे वाळूचा अमर्याद वाळू उपसा होत असल्याने नदी पात्रात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पिंपरखेड गावालगत विंचरणा नदी आहे. मागील तीन-चार वर्षे दुष्काळाचे चटके येथील गावकर्‍यांनी वाळू उपसा झाल्यामुळे पाहीले आहेत. त्यामुळे या नदीपात्रातील वाळू लिलावास ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी विरोध करून, वाळूचे संरक्षण केले होते. विंचरणा नदीपात्रात यावर्षी मोठ्या प्रमाणात वाळू आहे. मागील पंधरा दिवसांपासून येथील विंचरणा नदीपात्रातून वाळूउपसा होत आहे. याबाबत तहसीलदार विजय भंडारी, महसूल कर्मचारी व पथकास ग्रामस्थांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केले परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज गावकर्‍यांनी वाळूउपसा करणारे ट्रॅक्टर नदी पात्रातच रोखून धरले होते. तहसीलदार विजय भंडारी यांच्याशी संपर्क साधला मात्र, त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे थेट जिल्हाधिकारी कार्यालयास संपर्क साधून घटनेची माहिती देताच तहसीलदारांनी नायब तहसीलदार अविनाश रणदिवे व दोन कर्मचार्‍यांचे पथक पाठवले. पथक येईपर्यंत एक ट्रॅक्टर चालक टॅक्ट्रर घेऊन पळून गेला, तर एका ट्रॅक्टरला वाळूसह घेऊन जामखेड तहसील कार्यालयात आले. तालुक्यातील नदीपात्राच्या विविध ठिकाणी बेसुमार अवैधरित्या वाळूउपसा सुरू आहे. याबाबत येथील महसूल प्रशासन तक्रार करूनही दखल घेत नाही. त्यामुळे आता थेट जिल्हाधिकारी यांनाच फोन करून तालुक्यातील अवैध वाळू उपसा थांबवला जाईल अशी आशा धनेगाव, दिघोळ, जातेगाव, भवरवाडी, नान्नज, जवळा येथील नागरिकांनी व्यक्त केली.