Breaking News

सेवा क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांना संधी


मुंबई : 'आपल्या देशाची 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षे वयाच्या खालची असून युवकांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास उद्योग व सेवा क्षेत्रासोबतच इतर क्षेत्रातही देश जगाचे नेतृत्व करू शकेल. त्यादृष्टीने शासन, उद्योग व खासगी संस्था एकत्र येऊन काम करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या सिटीझन एन्गेजमेंटचे प्रमुख सोबिन कुरीयाकोस यांनी केले.

गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित सेवा क्षेत्रासंबंधीच्या जागतिक प्रदर्शनात 'औद्योगिक क्षेत्रातील कौशल्य विकास' या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत विविध व्यवसायांचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले जात असून त्याचा लाभ गरजू व्यक्ती तसेच उद्योगांना होत असल्याचे श्री. सोबिन यांनी सांगितले. सेवा क्षेत्रात प्रशिक्षित उमेदवारांना असंख्य संधी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान पारंपरिक शिक्षणासोबतच व्यवसायाभिमुख प्रशिक्षिण देण्यासाठी विविध कल्पक प्रयत्न केले जात असून औद्योगिक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जात असल्याचे सीआयआयच्या कौशल्य विकास समितीचे अध्यक्ष तथा व्हर्टिव एनर्जीचे कार्यकारी व्यवस्थापक सुनील खन्ना यांनी सांगितले.

या चर्चासत्रात राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत कृष्णा यांनी कौशल्य विकासाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघदूत कर्णिक,शॉपर स्टोपचे उपाध्यक्ष योगेश बिश्त, इलेक्ट्रॉनिक सेक्टर स्किल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. के. मोहपात्रा, अपोलो मेड स्किलचे मुख्य विपणन अधिकारी श्रीनिवासन श्रीधर तसेच महिंद्रा हॉलिडेज ॲण्ड रिसॉर्टचे कॉर्पोरेट मॅनेजर सुमीत घई आदींनीही यावेळी आपले विचार मांडले.