Breaking News

यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने तमाशा क्षेत्राला वेगळा आयाम देणारा ज्येष्ठ कलावंत गमाविला - विनोद तावडे


मुंबई : गावागावांतून पोटासाठी कलाप्रदर्शन करणाऱ्या आपल्या कोल्हाटी समाजाला स्थैर्य यायला हवे यासाठी सातत्याने आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने तमाशा क्षेत्राला एक वेगळा आयाम देण्याचे काम करणाऱ्या ज्येष्ठ कलावंताला आपण गमाविले आहे, या शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे.

श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, यमुनाबाई यांनी एकलव्याच्या निष्ठेने इतरांचे तमाशे, लावण्या ऐकल्या आणि आत्मसात केल्या. भावकाम, हातांची अलवार हालचाल, लावणीतला सारा आशय बैठकीत बसून केवळ देहबोलीतून प्रभावीपणे व्यक्त करायला त्या शिकल्या. लावण्यांसह गझल, कव्वाली, ठुमरी यामध्येही त्यांचे योगदान होते. पारंपरिक पद्धतीने बैठकीची लावणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका होत्या. आयुष्याच्या मार्गातील अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जात त्यांनी स्वतःच्या कलेने, लावणीला सम्राज्ञीपदावर पोहचवले. कलेबरोबरच गावाला, समाजाला आणि याच वाटेने चालणाऱ्या असंख्य कलाकारांना आनंदाचे वाटेकरी केले. यमुनाबाईंनी कोल्हाटी-डोंबारी समाजास केंद्र शासनाच्या दप्तरी अत्यंत गौरवाचे स्थान मिळवून दिले.