Breaking News

वारली चित्रकलेला ख्याती मिळवून देणारा सच्चा कलाकार गमावला


मुंबई : वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळूवन देणारे पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांच्या निधनाने एक सच्चा कलाकार कायमचा गमावला असल्याची भावना सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.

श्री. तावडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, देशातील पहिले आदिवासी चित्रकार म्हणून जीवा सोमा म्हसे यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागात राहूनही आपल्या कलेद्वारे सातासमुद्रापार आपली ओळख निर्माण करणाऱ्या श्री. म्हसे यांनी पारंपरिक वारली, आदिवासी चित्रकलेच्या माध्यमातून वारली चित्रकलेला वैभव मिळवून दिले. आज वारली चित्रकलेला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळत असून यामध्ये पद्मश्री म्हसे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. संवेदनशीलता आणि प्रभावी कल्पनाशक्तीच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या म्हसे यांनी आदिवासी कलेचे सांस्कृतिक दर्शन आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून जगाला दाखविले. वारली चित्रकलेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी राज्य शासनाच्या मदतीने त्यांनी वेगवेगळ्या कार्यशाळाही घेतल्या होत्या.