Breaking News

राहुरी फॅक्टरी येथे माऊली हॉटेलला आग ३ लाखांचे नुकसान


राहुरी ता. प्रतिनिधी - येथील नगर- मनमाड महामार्गालगत असलेल्या हॉटेल माऊलीला विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याची घटना काल {दि. ३} रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत ३ लाखांचे नुकसान झाले.

राहुरी फॅक्टरी येथे नगर- मनमाड मार्गावर किशोर कोबरणे यांच्या मालकीचे हॉटेल आहे. गुरुवारी रात्री कोबरणे आणि त्यांचे कर्मचारी हॉटेलचे कामकाज आटोपून घरी गेले. रात्री १२ च्या सुमारास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे अचानक आग झाली. आगेचा वणवा दिसताच परिसरातील युवकांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली. यावेळी देवळालीप्रवरा आणि राहुरी नगरपालकीच्या अग्निशामक बंबास बोलविण्यात आले. या बाबांनी आग विझवली. मात्र या दुर्देवी घटनेत ४ फ्रिज, किराणा माल, फर्निचर, फॅन, टेबल, खुर्च्या आदी जळून खाक झाले. आग विझविण्यासाठी विठु वाळके, भगत यांनी जीवाची पर्वा न करता मदत केली. घटनास्थळी दीपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, विजय गव्हाने, गणेश भांड, शिवाजी कपाळे, दत्ता म्हसे, सुरेश वाबळे यांनी धाव घेतली. दरम्यान, घटना घडून १२ तास उलटले तरी पोलिस अथवा महसूल प्रशासनाचे अधिकारी फिरकले नाहीत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असताना महसूल प्रशासनाने पंचनामा करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. राहुरी फॅक्टरी परिसरात कुठलीही घटना घडली, तर स्थानिक प्रशासन दखल घेत नाही, असा आरोप स्थानिक नागरिकांमधून केला जात आहे. दरम्यान, या घटनेचा तात्काळ पंचनामा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राहुरी फॅक्टरी येथील सर्वपक्षीय समितीच्यावतीने देण्यात आला आहे.