Breaking News

‘सोमैय्या’च्या पाण्यावरुन ग्रामसभेत खडाजंगी

कोपरगाव ता. प्रतिनिधी - तालुक्यातील कान्हेगाव येथे महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेच्या सुरुवातीलाच साईनाथ काळे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. वाड्या- वस्त्यांवर पिण्याचे पाणी मिळत नाही, काही काही भागात ८-८ दिवस पाण्याचे टँकर जात नाही, अशा तक्रारी ग्रामसभेत करण्यात आल्या. या प्रश्नावरून ग्रामसभेत प्रचंड खडाजंगी झाली. 

गावाला पाणी पुरवठा कोण करतो, असा प्रश्न काळे यांनी ग्रामसेवकांना विचारला. त्यावर सोमैया कारखान्याकडून सर्व गावाला पाणी पुरवठा केला जातो, असे त्यांनी सांगितले. तरीही अनेक अशा तक्रारी मिलिंद पांडव व इतरांनी केल्या. त्यामुळे नागरिकांनी पाणी प्रश्नावर सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांना चांगलेच धारेवर धरले. याबाबत सोमैया कारखान्याच्या व्यवस्थापनाला पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसा ठरावही मंजूर करण्यात आला. येत्या आठ दिवसांत पाणी प्रश्न सुटला नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा अजय भडांगे यांनी दिला. यावेेेळी कृषी पर्यवेक्षक मंडलिक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाचकर, ग्रामसेवक सुधाकर पगारे, अंगणवाडीसेविका वनिता भाकरे, शिक्षकवृंद आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.