Breaking News

माणसाने विजयाच्या उन्मादात जगावे - अॅड. होडगर

आश्वी : प्रतिनिधी - जीवन जगत असताना कृतीतून आणि कामातून माणूस शोभून दिसतो. कामाची कणकण अंगात असणे यासारखे दुसरे भूषण नाही. कामांनी माणूस थकत नाही आणि कामाचे दुष्परिणामसुद्धा नाहीत. माणसाने विचारपूर्वक कृती केली पाहिजे. तसेच जीवनात पुढे जाण्यासाठी मनामध्ये स्वप्न बाळगले पाहिजे. जीवनाचे ध्येय निश्चित केले पाहिजे. त्यासाठी माणसाने जीवन जगताना विजयाच्या उन्मादात जगावे, असे प्रतिपादन मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अॅड. शाळिग्राम होडगर यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संकुलात महाराष्ट्रदिन आणि कामगारदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संचालिका नीलिमा गुणे, संस्थेचे कार्यकारी संचालक मंडलिक, प्राचार्य विजय पिसे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे, अण्णासाहेब बलमे, शीतल कुटे आदींसह शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, याप्रसंगी वर्षभरात उत्कृष्ट काम केलेल्या कामगारांना ‘ उत्कृष्ट कामगार ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जोशी यांनी केले. अलका गोसावी यांनी आभार मानले.