मोफत दूध वाटप करून दरवाढीसाठी आंदोलन
सोलापूर, दि. 10, मे - दुधाचे दर त्वरित वाढवण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा देत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा निषेध म्हणून कुरुलमध्ये मोफत दूध वाटप करण्यात आले. गाईच्या दुधास प्रतिलिटर 35 तर म्हशीच्या दुधास 45 रुपये भाव मिळण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी कुरुल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष छत्रपती जाधव, भीमा शुगरचे संचालक बापू जाधव आदी उपस्थित होते. याप्रसंगी जाधव म्हणाले, जनावरे संभाळत पशुपालक मेटाकुटीला आले असताना खुराकाचे दर वाढले आहेत. उन्हाळा असल्याने चार्याची टंचाई भासत आहे. परंतु दुधाचे दर कमी आहेत. सरकारने पशुपालकांचा विचार करून दुधाचे दर वाढवले पाहिजेत. जनावरांच्या चार्याचे दर वाढत आहेत. मात्र दुधाचा दर कमी होत आहे. दुधाचा दर वाढवून नाही दिला तर संबंधित मंत्र्यांची गाडी जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकरी प्रशांत पाटील म्हणाले, खासगी, दूध संस्था पशुपालकांकडून कमी दराने दूध खरेदी करून त्याच दुधात भेसळ करतात, चढ्या दराने विकतात. त्यामुळे योग्य दर मिळत नाही. भेसळ रोखण्यासाठी सरकारने कार्यवाही करावी.