Breaking News

पाटाडी वस्तीवर हरणाच्या पाडसास जीवदान

शहरापासुन 1 किलोमीटरवर असलेल्या पाटाडी वस्तीवरील शेतामध्ये सकाळी 9 वाजेच्या दरम्यान हरणाच्या कळपातुन हरवलेले एक लहानसे पाडस भयभीत अवस्थेत पाटाडी वस्तीवरील निलेश औटी या युवकास निर्दशनास पडले. तात्काळ या युवकाने या लहानग्या जिवाला आपल्या कुशीत उचलुन घेतले व जवळच असलेल्या वस्तीवर आणले, या जिवाला पाणी व चारा देऊन शांत केले. 

पाटाडी वस्तीवरील शेतामध्ये गेल्या वर्षीच्या पावसाने सर्व परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे. सगळीकडे शेतामध्ये हिरवीगार पिके असल्याने पाटाडीवस्ती, चेडे मळा, संगमेश्‍वर परिसर, सिध्देश्‍वर वाडी, पानोलीरोड परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप दिसुन येतात. परंतु आता मे महिन्याच्या उष्णतेमुळे या भागातील नद्या, नाले, ओढे, बंधारे, विहीरीचे पाणी कोरडे ठाक झाले आहेत. त्यामुळे या वन्यजीवांना तहान भागविण्यासाठी मानवी वस्तीजवळ यावे लागते. याच कळपातील एक लहानगं पाडस पाटाडी वस्तीवरील शेतामध्ये निलेश औटी या युवकाला दिसुन आले. याच परिसरातील पर्यावरणप्रेमी गोरख औटी यांना या युवकांनी हरणाच्या पाडसाबद्दल संपर्क करून माहिती दिली. तात्काळ या पर्यावरणप्रेमींनी पारनेर मधील वनाधिकारी कोकाटे यांच्याशी संपर्क करुन माहिती दिली. तात्काळ सामाजिक वनविभागाचे वनसरंक्षक घोरपडे, बोरुडे, अंकुश जाधव, आकाश कोळी या ठिकाणी उपस्थित झाले. या युवकांनी या वन्य जिवाला वनविभागाच्या ताब्यात दिले. पाटाडीवस्ती वरील भिमा औटी, निलेश औटी, व पर्यावरण प्रेमी गोरख औटी यांचे या लहानग्या जिवास जिवदान दिल्याबद्दल कौतुक होत आहे.