Breaking News

भोजापुर पुरचारीचे नामांतर पुतना मावशीची पुरचारी चारीत बिस्लरीच्या बाटल्या ओतून आंदोलकांनी केले नामांतर

भोजापुर धरण उंची वाढ आंदोलनाच्या वतीने संगमनेर तालुक्यातील तळेगावदिघे पर्यन्तच्या अर्धवट खोदलेल्या आणि कधीही भोजापुरचे पुरपाणी न आलेल्या भोजापुर पुरचारीचे नामांतर पुतना मावशीची पुरचारी करण्यात आले. सोनोशीच्या माथ्यावर चारीत बिस्लरीच्या बाटल्या ओतून आंदोलकांनी पुरचारीचे नामांतर करुन भोजापुर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्याची मागणी केली. तर यासाठी संगमनेर उप जिल्हाधिकारी कार्यालया समोर बुधवार दि.6 जून पासून उपोषण करण्याचा इशारा दिला.


सन 1972 ते 73 साली भोजापुर धरण पुर्ण झाले परंतू या धरणाची उंची नियोजित उंची पेक्षा तीन मीटरने कमी ठेवण्यात आली. सिन्नर, संगमनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना त्यामुळे न्याय मिळू शकला नाही. संगमनेर तालुक्यातील निमोन सोनोशी, नान्नजदुमाला, काकडवाडी, पोरेगाव खुर्द, पोरेगाव बुद्रुक, तीगांव, तळेगाव दिघे इत्यादी गावांसाठी वीस वर्षापासून भोजापुर पुरचारी करण्याबाबत निर्णय झालेला आहे. परंतू सातत्याने येथील विधानसभेचे नेतृत्व करणार्‍या लोकप्रतिनिधीने या भागातील ग्रामस्थांना फक्त आश्‍वासने देवून पुरचारीचे काम अद्यापि पुर्ण केलेले नाही. त्यामुळे या चारीमध्ये धरणाचे पाणी येवू शकले नाही. सरकारतर्फे शास्त्रीय अभ्यासाद्वारे या भोजापुर धरणाची उंची तीन मिटरने वाढविणे वाजवी व योग्य ठरणार असल्याचा अहवाल आहे. ठरलेल्या नियोजन प्रमाणे उंची न ठेवल्याने धरणामध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाणी साठा होतो. भोजापुर धरणाची उंची तीन मीटरने वाढविण्यासाठी भोजापुर धरण उंची वाढ आंदोलनाच्या वतीने संगमनेर उप जिल्हाधिकारी कार्यालया समोर बुधवार दि.6 जून पासून उपोषण करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला.
वरील सततच्या दुष्काळी गावांमध्ये भुजल पातळी खोल गेली आहे. तर शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. भोजापुर चारीत पाणी न आल्याने या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावातील ग्रामस्थ नरकयातना भोगत आहे. अनेक वर्ष नागरिकांची मते खावून त्यांची कामे न करणार्‍या नेतृत्वाला डब्यात टाकण्यासाठी भाकरी फिरवा 2019 या मंत्राची अमंलबजावणी करण्याची घोषणा आंदोलकांनी केली व परिवर्तनाची हाक दिली.
संगमनेर तालुक्यात अनेक गावे मुलभुत सुविधांपासून वंचित आहे. ते नरकयातना भोगत असून, हे सर्वांपुढे येण्यासाठी यमयातना पहाणी पथकाची स्थापना केली जाणार असल्याचे अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले. पंचवीस वर्षापेक्षा जास्त सत्तेचा उपभोग घेणार्‍या येथील लोकप्रतिनिधीने रस्ते, पाणी व वीज या मुलभुत सुविधा निर्माण करण्यात असमर्थ ठरले आहे. त्यांच्या निष्क्रीयतेमुळे स्थानिक ग्रामस्थ देशोधडीला लागले असून, बदल घडविण्याची जबाबदारी स्विकारण्याचे आवाहन भिमराज चत्तर यांनी केले. या आंदोलनात भिमराज चत्तर, किसन चत्तर, विनायक गुंजाळ, अ‍ॅड.कारभारी गवळी, धर्मराज मोकळ, सोमनाथ कडनर, पुंजाराम लाड, सोपान बोरडे, रघूनाथ मोकळ, सुनिल नेटके, छगन कडनर आदि सहभागी झाले होते.