Breaking News

पर्यावरणप्रेमींचा पशुपक्षांसाठी स्तुत्य उपक्रम


सावली परिवार व अहमदनगर पक्षीमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये पक्षी संवर्धनासाठी एक मुठ धान्य, एक ओंजळ पाणी पक्षांसाठी हे अभियान राबवण्यात येत असून या अभियानांतर्गत संदिप राठोड यांच्या नेतृत्वाखाली व पक्षीअभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या टिमने जिल्हाभरातील 50 पेक्षा अधिक शाळांना भेटी देवुन 8 हजार विद्यार्थ्यांना या अभियानाविषयी माहिती देत याचे महत्व पटवून दिले.

उन्हाळ्यात पाण्याअभावी पशु-पक्षी संकटात सापडतात. या काळातच त्यांच्या मृत्युचा व स्थलांतराचा दर वाढतो. हे जाणता या उन्हाळ्याच्या सुरूवातीला हे अभियान आयोजित करण्यात आले. मानवी जीवन हे पुर्णपणे निसर्गावर कसे अवलंबून आहे, मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाचा समतोल कसा ढासळत चालला आहे, जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यामध्ये कोणत्या प्रकारच्या पर्यावरणीय समस्या निर्माण होवु शकतात व त्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निसर्गसाखळीत पक्षी हा महत्त्वाचा घटक असुन, तो सातत्याने वृक्षारोपणाचे कार्य करत असतो हे स्पष्ट करून सांगितले. मात्र आज नष्ट होण्याच्या मार्गावर असणार्‍या अनेक पक्षांच्या व प्राण्यांच्या प्रजाती यांची सचित्र माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या अंगणामध्ये पशुपक्षांसाठी पाणपोई सूरू करण्याचे मार्गदर्शनही करण्यात आले. सध्या सुरू होणारी लग्नसराई विचारात घेता अक्षदांऐवजी फुलांचा वापर करून वाचणारा तांदुळ अगर धान्य या उपक्रमासाठी पक्षीमित्रसंघटनेस देण्याचे अवाहन पक्षीमित्रांनी केले आहे. या संकल्पनेतून जवळपास 12 पोते धान्य संकलित झाले आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पो. कॉ. अर्जुन जिवडे, सुभाष सोणवणे, सचिन चव्हाण, शिवकुमार वाघुंबरे, अनमोल होन, बाबासाहेब जायभाय, संजीवनी दौड, सविता गर्जे, काळु जाधव, दिपक राठोड, अशोक दहिफळे, अंबादास केदार, सतिष कासार, प्रसाद मरकड, गणेश जगताप, अमोल राठोड, अशोक कराड, संजय राठोड, महादेव शिंदे, सुनिल शिरसाठ, सरपंच अनिल गीते आदींनी विशेष परिश्रम घेतले.