Breaking News

मान्सून केरळात दाखल ; लवकरच महाराष्ट्रात आगमन

नवी दिल्ली : केरळातील मान्सूनचे हे आगमन देशभरातील यंदाच्या पाऊसमानासाठी सुचिन्ह म्हणावे लागेल. खाजगी हवामान संस्था स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याने सोमवारी सकाळी 8:15 ला प्रसिध्द केलेल्या वार्तापत्रानूसार मान्सूनची केरळातील सद्य परिस्थिती पाहता देशातील पाऊसकाळ सुरू झाला म्हणण्यास हरकत नाही. स्कायमेटचे सीईओ जतीन सिंह यांनी दिलेल्या माहीतीनुसार 28 मे रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवली तर भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानूसार 29 मे’ रोजी मान्सून केरळात दाखल होईल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट या खासगी संस्थेनेदेखील 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मान्सूनचा पाऊस समजला जातो. मुख्यत्वे शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि विकास दरावर दिसून येतो.


दरम्यान, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातून सध्या उष्णतेच्या लाटीने काही प्रमाणात माघार घेतल्याची माहितीही स्कायमेटने दिली. विदर्भातील ठराविक भागात अजूनही उष्णतेचा तडाखा कायम आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी जास्त उष्णता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण विदर्भाच्या काही भागांत हलकासा पाऊस झाल्यामुळे कमाल तापमानामध्ये घट झाली. त्यामुळे सध्या तेथील तापमान 40 अंशांपर्यंत नोंदवलं जात आहे. रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून 24 तासात नागपूर येथे 35.8 मिमी, सातारा 33 मिमी, कोल्हापूर 7 मिमी, तर वर्धा येथे 1.6 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असल्याची माहिती स्कायमेटने दिली.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्यामुळे वारे सध्या मध्य प्रदेशाकडून विदर्भ ओलांडून दक्षिण मध्य महाराष्ट्रकडे वाटचाल करत आहे. यामुळे द क्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांत आणि विदर्भातील काही भागांत पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 ते 48 तासात महाराष्ट्रातील उष्ण लाट सर्व ठिकाणची कामी होऊन तापमानामध्ये सुध्दा घट होईल. दक्षिण महाराष्ट्रामध्ये 30 मे पासून मोसमी पावसाचं आगमन होईल, अशी अपेक्षा आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचं आगमन होऊ शकतं, असं स्कायमेटने म्हटलं आहे.